नव्या अभ्यासक्रमात कृतीप्रधान, चित्ररूपावर भर

By Admin | Updated: May 31, 2014 00:32 IST2014-05-31T00:12:08+5:302014-05-31T00:32:59+5:30

मारूती कदम, उमरगा चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी, चौथी वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असून, यात कृतीप्रधान आणि चित्ररूपावर अधिक भर देण्यात आला आहे़

In the new curriculum, artificial, emphasis on pictures | नव्या अभ्यासक्रमात कृतीप्रधान, चित्ररूपावर भर

नव्या अभ्यासक्रमात कृतीप्रधान, चित्ररूपावर भर

मारूती कदम, उमरगा चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी, चौथी वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असून, यात कृतीप्रधान आणि चित्ररूपावर अधिक भर देण्यात आला आहे़ विद्यार्थ्यांना श्रवण, भाषण, संभाषण वाचन, लेखन ही भाषिक कौशल्ये चांगल्या प्रकारे विकसित व्हावीत, निसर्गत: असलेली चित्रांची आवड व स्वत: काही करण्याचा उद्देश लक्षात घेऊन प्रत्येक पुस्तकात विषयाशी बोलणारी व संकल्पना स्पष्ट करणार्‍या कृतीप्रधान चित्रकृतीवर अधिकच भर देण्यात आला आहे़ इयत्ता तिसरीच्या बालभारती या पुस्तकावर ग्रंथालय इमारत, अंगण, रस्ते, निसर्ग सौंदर्याने नटलेले रस्ते, पाळीव प्राणी या निसर्ग रम्य वातावरणात चिमुकले विद्यार्थी अभ्यासात प्रसन्नतेने रममाण झाल्याचे दाखविण्यात आले आहे़ इंग्रजी पुस्तकातील प्रत्येक पाठातील संकल्पना सपष्ट दर्शविणारी चित्रकृती विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रभावी ठरणारी आहे़ गणिताच्या पुस्तकात अध्ययन अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रीत करण्यासाठी कृतीप्रधानता व ज्ञानरचनावादावर भर देण्यात आला आहे़ विद्यार्थ्यांना निसर्गत:च असलेली चित्रांची आवड लक्षात या पुस्तकात गणिताच्या संकल्पना स्पष्ट करणार्‍या बोलक्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे़ विद्यार्थ्यांना गणित संबोधांची उजळणी व्हावी म्हणून त्यांचे स्थिरीकरण व्हावे स्वयं अध्ययन सुलभ व्हावे म्हणून पुस्तकात श्रेणीबध्द स्वाध्याय आणि संवादांचा समावेश करण्यात आला आहे़ तिसरीच्या मराठी पुस्तकात शेवटच्या पानावर कडूनिंबाचे झाड व त्याचे औषधी व व्यवहारी उपयोगी दाखविण्यात आले आहेत़ वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी पाठ क्रमांक २६ मध्ये निसर्ग सौंदर्यात बागडणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षक रोपटे भेट देणारे चित्र आदर्शवत ठरणारे आहे़ पाठ क्रमांक २३ मध्ये रमाई भीमराव आंबेडकर यांच्या विशिष्ठ जीवनाचा आढावा घेणारा पाठ चित्ररूपाने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे़ ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची सुगी, मजेशीर होड्या, रानपाखरं, खजिना शोध, सण, भारतीय संशोधक, मधमाशीची कमाल, ट्रॉफिकदादा, रानवेडी, आम्ही बातमी वाचतो, संत गाडगेबाबा, प्रकाशातील तारे, पाणी किती खोल इत्यादी पाठातील संकल्पना चित्ररूपाने रेखाटण्यात आल्या आहेत़ इयत्ता चौथीच्या मुखपृष्ठानंतरच्या पहिल्या पानावर शाळा, निसर्ग सौंदर्याने नटलेला शाळेचा परिसर, निसर्गाच्या सानिध्यात खेळणारी मुले या बोलक्या चित्रांनी हे पुस्तक विद्यार्थ्यांना अधिक आपलेसे वाटणार आहे़ धरतीची आम्ही लेकरं या़द़नाग़व्हाणकर यांच्या कवितेत ज्वारीच्या फडात असलेल्या आरोळ्यावर उभारून विद्यार्थीनी गोपनीने पाखरांची राखण करीत असलेली संकल्पना विशेषत: शहरी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे़ बोलणारी नदी, मला शिकायचं आहे, मायेचं पाखरं, धूळपेरणी, गुण ग्राहक राजा, धाडसी झाली, वाटाड्या, मोठाचा शोध, आनंदाचा झाड या पाठातील चित्र कृतीप्रधान ठरणारी आहेत़ चौथीच्या पाठ क्ऱ २० मध्ये कोलाज या सचिन रमेश तेंडुलकर या पाठात सचिनचा जन्म, पहिला कसोटी सामना, पहिला एकदिवशीय सामना, एक दिवशीय शतके, अर्धशतके, कासोटी शतके, एक दिवशीय सामन्यातील धावा, जागतिक विक्रम, शेवटचा कसोटी सामना, निरोप समारंभातील भाषण, सचिनच्या जीवनातील सुख, दु:खाचे प्रसंग वर्तविण्यात आले आहेत़ चित्रे, कविता यांची कलात्मक मांडणी करून तेंडुलकरचा आदर्श या पुस्तकाच्या रूपाने मांडण्यात आला आहे़ शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी जीवनाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी यावर्षीपासून रीतसर अभ्यास भाग दोन हे स्वतंत्र पुस्तक अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आले आहे़ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, संतांची कामगिरी, मराठा सरदार, भोसल्यांचे कर्तबगार घराणे, शिवरायांचे बालपण, शिक्षण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, प्रताप गडावरील पराक्रम, शर्थीने लढविलेली खिंड, शाहिस्तेखानाची फजिती, पुरंदराचा वेढा, तह, बादशाहाच्या हातावर दिलेल्या तुरी, गड आला पण सिंह गेला, युध्दनीती, रयतेचा राजा या विविध पाठातील सर्व प्रसंग चित्ररूपाने दाखविण्यात आले आहेत़ गणिताचीही लागणार गोडी गणिताच्या पुस्तकातील भौमितीक आकृत्या, नानी व नोटा, कालमापन किलोमिटर, मोबाईलची आजची सामाजिक गरज, परिमिती क्षेत्रफळ या विविध कृतीप्रधान आणि चित्ररूपांची सुबक मांडणी करण्यात आली आहे़ इयत्ता तिसरी आणि चौथीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या सर्व पाठातील संकल्पना चित्ररूपाने मांडण्यात आल्याने या बदलत्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे़ या अभ्यासक्रमात मोबाईल वापराचेही चित्ररूप संपादन करण्यात आल्याने ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आपुलकीची ठरणार आहेत़

Web Title: In the new curriculum, artificial, emphasis on pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.