महिनाभरात नवीन नगराध्यक्षांची निवड
By Admin | Updated: May 22, 2014 00:35 IST2014-05-22T00:19:29+5:302014-05-22T00:35:58+5:30
हिंगोली : हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ

महिनाभरात नवीन नगराध्यक्षांची निवड
हिंगोली : हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार असून, तत्पूर्वी नवीन नगराध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हिंगोली, वसमत व कळमनुरी नगर पालिकेसाठी ११ डिसेंबर २०११ रोजी मतदान झाले होते. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होण्यास वेळ लागल्याने नगराध्यक्ष निवडीस दिरंगाई झाली. त्यानंतर ३० डिसेंबर २०११ रोजी तिन्ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यामध्ये हिंगोलीत राष्टÑवादीची सत्ता आल्याने दिलीप चव्हाण यांची तर कळमनुरीत काँग्रेसची सत्ता आल्याने सादिया तब्बसूम व वसमतमध्ये शिवसेना-भाजपाची सत्ता आल्याने कुमुदिनी बडवणे यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ असल्याने विद्यमान तिन्ही ठिकाणच्या नगराध्यक्षांची निवड ३० जूनपूर्वी होणे आवश्यक आहे. त्यानुसार २२ जून पासून नवीन नगराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नवीन नगराध्यक्ष निवडीस एक महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, ती २५ जूनला संपणार आहे. त्यामुळे आता तिन्ही ठिकाणच्या विद्यमान नगराध्यक्षांना कुठलेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. शिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभा घेण्यावरही बंधन आले आहे. त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षांची एकप्रकारे गोचीच झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) हिंगोली नगरपालिकेत बदलाची चर्चा नगर विकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. राष्टÑवादीकडून नगरसेविका अनिता सूर्यतळ या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानल्या जातात. दुसरीकडे काँग्रेसच्या आशाताई उबाळे याही नगराध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. पालिकेत राष्टÑवादीची सत्ता असली तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील राष्टÑवादीमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. राष्टÑवादीच्या एका गटाने शिवसेनेला मदत केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाराज असलेल्या दुसर्या गटाने वेगळ्याच हालचाली चालविल्या आहेत. त्यामुळे पालिकेत सत्ताबदल होण्याचीही चर्चा शहरात होताना दिसून येत आहे. असे असले तरी येत्या महिनाभरात पडद्यामागे अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्टÑवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या इच्छुक नगरसेवकांकडून नगराध्यक्ष पदासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.