नवीन बोर्ड बसविणे सुरू
By Admin | Updated: December 23, 2015 00:10 IST2015-12-22T23:43:18+5:302015-12-23T00:10:01+5:30
वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन अखेर महावितरण प्रशासनाने सिडको वाळूज महानगरातील कालबाह्य झालेल्या वीजतारा व बोर्ड दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

नवीन बोर्ड बसविणे सुरू
वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन अखेर महावितरण प्रशासनाने सिडको वाळूज महानगरातील कालबाह्य झालेल्या वीजतारा व बोर्ड दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मंगळवारपासून साईनगर भागात नवीन विद्युत बोर्ड बसविण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे.
सिडको वाळूज महानगरातील लघु व मध्यम भागातील वीजतारा व बोर्ड जीर्ण झाल्याने नागरिकांना कायम विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. जुन्या वीजतारा व केबल वायर असल्याने कुजून आपोआप अनेक ठिकाणी तुटत आहेत. घरालगत असलेल्या बोर्डची अवस्था तर फारच दयनीय झाली आहे. मुले रस्त्यावर खेळत असल्याने व नागरिकांची ये-जा सुरू असल्याने या भागात शॉक लागून एखादी दुर्दैवी घटना घडण्याचा धोका आहे. यासंदर्भात साईबाबा मित्रमंडळाचे दत्तात्रय वर्पे व आम आदमीचे प्रकाश जाधव यांनी २ आॅक्टोबर रोजी सिडकोतील महावितरण कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी महावितरण प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना महिनाभरात काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.
काम मंजूर असतानाही महावितरण प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणला. वृत्ताची दखल घेऊन अखेर हे काम महावितरणने हाती घेतले आहे. मंगळवारी साईनगर भागापासून नवीन विद्युत बोर्ड व केबल वायर बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या भागात जवळपास ५४ नवीन विद्युत बॉक्स बसविण्यात येणार असून त्यानंतर केबल वायर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.