नवीन २० शहर बसेस रद्द
By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-31T00:04:58+5:302014-05-31T00:29:33+5:30
नांदेड : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन २० शहर बसेस महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अखेर रद्द झाल्या आहेत़

नवीन २० शहर बसेस रद्द
नांदेड : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन २० शहर बसेस महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अखेर रद्द झाल्या आहेत़ यासंदर्भात एस़ टी़ महामंडळाकडे बोट दाखवित महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे़ शहर बस वाहतुकीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने नांदेड शहराला २० शहर बसेसची मागणी केली होती़ यासंबंधात महानगरपालिकेने दिलेला २ कोटी ४० लाख रूपयांचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम विभागाने मंजूर केला होता़ त्यानंतर जून २०१३ मध्ये या बसेस शहरात धावतील, अशी घोषणाही महापालिकेने केली होती़ मात्र अद्यापपर्यंत या बसेस आल्या नाहीत़ एसटी महामंडळ व महापालिका यांच्यातील समन्वयाअभावी नवीन मंजूर झालेल्या शहर बसेस गमवण्याची वेळ आली़ तीन वर्षांत खिळखिळ्या झालेल्या शहर बसेसवरच आता नांदेडकर समाधान मानावे लागणार आहे़ मंजूर झालेल्या शहर बसेस रद्द झाल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या दैनंदिन प्रवासासाठी चालविण्यात येणार्या शहर बसेसची सेवा महापालिका प्रशासन व एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे कोलमडली आहे़ दहा मोठ्या व वीस मिनी बस एसटी महामंडळाकडे आॅक्टोबर २०१० मध्ये हस्तांतरित करण्यात आल्या होत्या़ अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत शहर बसेसची दुरवस्था झाली आहे़ बसेस चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगत एस़ टी़ महामंडळाने त्या भंगारमध्ये जमा केल्या आहेत़ या बसेसचे पार्ट मिळत नसल्याचे तसेच दुरूस्ती करण्यासाठी कुशल कामगार नसल्याचे कारण एस़ टी़ महामंडळ सांगत आहे़ तर महापालिका एस़ टी़ महामंडळाकडे शहर बसेस स्वाधीन केल्याचे सांगत नागरिकांच्या सुविधांपासून अंग काढून घेत आहे़ (प्रतिनिधी) मनपाचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता राजकुमार वानखेडे यांनी सांगितले, शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी यापूर्वी जेएनएनयुआरएम योजनेतून २० मिनी व १० मोठ्या अशा एकूण ३० बसेस मनपाकडे हस्तांतरित केल्या होत्या़ त्यानंतर मनपाने एस़ टी़ महामंडळासोबत करार करून शहर बसेस हस्तांतरित केल्या़ त्यानंतर पुन्हा नवीन २० शहर बसेसची मागणी करण्यात आली़ मात्र एस़ टी़ महामंडळाने या बसेस चालवण्यास असमर्थता दाखवल्याने त्या रद्द केल्या आहेत़