रिकाम्या खुर्चीला हार
By Admin | Updated: June 15, 2014 00:59 IST2014-06-15T00:34:39+5:302014-06-15T00:59:31+5:30
परतूर : कर्मचारी यांनी कार्यालयाला दांडी मारल्याने छावा कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत निषेध व्यक्त केला.

रिकाम्या खुर्चीला हार
परतूर : सध्या शेतकरी पेरणीचे दिवस असल्याने शेती मार्गदर्शन व शासनाच्या कृषी योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयात पायपीट करत असतांना कृषी कार्यालयात शुक्रवारी अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयाला दांडी मारल्याने छावा कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत निषेध व्यक्त केला.
कृषी कार्यालयाच्या पंचनाम्यानंतरही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दखल घेतलेली दिसत नाही. १३ जून रोजी रायपूर येथील शेतकरी आनंदसिंग मरमट व खांडवी येथील शेतकरी दत्ता बरकुले हे बियाणांसंदर्भात मार्गदर्शन व गारपीटग्रस्तांना पुरवणी यादीसंदर्भात या कार्यालयात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आले असता त्यांना कार्यालयात शुकशुकाट दिसला. त्यांनी कार्यालयाचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न होऊ शकल्याने छावा संघटनेला व काही पत्रकारांना बोलावले. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीला फुलांचा हार घालत या प्रकरणाचा निषेध केला. यावेळी या कार्यालयात एकूण २० कर्मचाऱ्यांपैकी लिपिक कुलकर्णी, शिपाई श्रीधर बेले, लिपिक हुंडीवाल व सतीश राठोड हे चारच कर्मचारी कामावर हजर होते. महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारसह सलग तीन दिवस कार्यालयाला दांडी मारण्याचा प्रकार येथील अधिकारी आणि कर्मचारी करत असल्याचे उघड झाले आहे. (वार्ताहर)