नेहरू रोड व कादराबाद रस्त्याचे होणार रुंदीकरण
By Admin | Updated: March 11, 2017 23:54 IST2017-03-11T23:53:29+5:302017-03-11T23:54:01+5:30
जालना : शहरातील नेहरू रोड आणि कादराबाद रस्त्याचे रूंदीकरण होऊन रस्ता पंधरा मिटरचा करण्यात येणार आहे.

नेहरू रोड व कादराबाद रस्त्याचे होणार रुंदीकरण
जालना : शहरातील नेहरू रोड आणि कादराबाद रस्त्याचे रूंदीकरण होऊन रस्ता पंधरा मिटरचा करण्यात येणार आहे. या संबंधीच निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच झाला. गत अनेक वर्षांपासून अरूंद असलेले हे रस्ते आता मोकळा श्वास घेणार असून, पालिका प्रशासनाने या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.
साधारणपणे ४० वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याचे काम सिमेंटमध्ये आहे. सद्यस्थितीत हा रस्ता ९ मीटर रूंद आहे. सराफा तसेच व्यापारी पेठ या मार्गावर असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व गर्दीचे प्रमाण वाढले आहे. रस्ता अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. जर रस्ता रूंद करावयाचा झाल्यास दोन्ही बाजूचे अनेक दुकाने व घरे पडणार आहेत. काही व्यापाऱ्यांचा विरोध तर काहींचे रूंदीकरणाला समर्थन आहे. रूंदीकरण झाल्यास वाहतूूक समस्या निकाली निघेल. व्यापाऱ्यांसह सर्वांनाच रस्त्याचा फायदा होईल. रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर रूंद करणार का अन्य मोजमाप करून करणार याचा नकाशा नगररचना विभागाने केला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. वेळप्रसंगी मोजमापात फरक होईल, असा अंदाज मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
कादराबाद रस्त्याचेही रूंदीकरण होणार आहे. कादराबाद रत्याचेही निर्मितीपासून रूंदीकरण झालेले नाही. पाणवेस ते मंगळबाजार दरम्यान हा रस्ता असून, हा रस्ताही १५ मीटर रूंद होणार आहे.
शहराचा गत काही वर्षांत आजूबाजूने विकास होत असला तरी शहरातही वाहतूक कोंडीसह इतर समस्या भेडसावत आहे. पाणीवेस, सराफा, अलंकार, सावरकर चौक आदी मार्गांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.