बेशिस्त वाहनचालकांना हवीय शिस्त
By Admin | Updated: June 26, 2014 00:39 IST2014-06-26T00:16:11+5:302014-06-26T00:39:39+5:30
मनाठा : हदगाव शहरातील दुचाकी, चार चाकी वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. वाहतूक बेशिस्त केल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व पालक पुरते वैतागले आहेत. अशांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

बेशिस्त वाहनचालकांना हवीय शिस्त
मनाठा : हदगाव शहरातील दुचाकी, चार चाकी वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. वाहतूक बेशिस्त केल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व पालक पुरते वैतागले आहेत. अशांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सध्या तालुक्यातील विद्यार्थी हदगावात येत आहेत. यासर्वांना बेफाम सुसाट गाड्या चालवणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. वयस्कर, महिला, बच्चे कंपनींना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नचा सामना करावा लागतो. तामसा टी पॉर्इंट, जुने बसस्टॉप, बाजारपेठ आदी ठिकाणी आॅटो थांबे त्रिकोणात लावल्याने व वाहतुकीचा कोणताही नियम न पाळता, डावी- उजवीकडे नागमोडी, वेगवेगळ्या वळणांनी धावणाऱ्या दुचकींचा त्रास जनतेला होत आहे.
पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आॅटो उभे करुन जोरजोरात ओरडणारे आॅटोचालक, पंचशील हायस्कूलपर्यंत उभे राहणारे आॅटो, काळ्यापिवळ्या जीप यांना शिस्त लावणार कोण? असा सवाल केला जात आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना अनेकदा हे दुचाकीस्वार धक्के मारुन पळतात किंवा हॉर्न जोरात वाजवून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. या वाहनधारकांचा हा त्रास बारमाही चालू असतो. तामसा टी पॉर्इंट येथे १ ते ४ तारखेपर्यंत एक पोलिस कर्मचारी हजर असतो. नंतर तो महिनाभर दिसत नाही. वृत्तपत्रात बातमी आली की, एखादा दिवस पोलिस फेरा मारतो, पुन्हा जैसे थे. याविषयी पोलिस यंत्रणा मार्मीक कारणे सांगतात, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, कामाचा व्याप वाढला आहे, असे सांगण्यात येते. शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यावर एखादा तास कर्मचारी दररोज हजर झाला तरीही ही समस्या ५० टक्के सुटू शकते. मात्र ही कामे केल्याने कोणी बक्षीस देत नाही, किंवा शाबासकीही मिळत नाही, त्यामुळे फुकटची कामे करायची नाही, असा संकल्प हदगाव पोलिसांनी केल्याचे दिसते.(वार्ताहर)
पोलिस उपाधीक्षक म्हणाले...
हदगावातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन जणांचे स्वतंत्र पथक निर्माण केले जाईल. हे पथक शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरातही फिरुन मोकाट दुचाकीस्वारांना वठणीवर आणणार आहे. हदगावातील अवैध व्यवसायाकडे स्थानिक पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. केवळ तात्पुरती कारवाई केली जाते. या सर्व अवैध व्यवसायावर निश्चितपण कारवाई केली जाईल- दत्तात्रय कांबळे, पोलिस उपाधीक्षक, हदगाव