पारदर्शक लिखाण करण्याची गरज
By Admin | Updated: November 16, 2014 23:37 IST2014-11-16T23:21:20+5:302014-11-16T23:37:36+5:30
जालना : शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार काम करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी समाजाला

पारदर्शक लिखाण करण्याची गरज
जालना : शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार काम करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी समाजाला लिखाणाच्या माध्यमातून जागृत करण्याबरोबरच पारदर्शक लिखाण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा मराठी पत्रकार संघ व परिषद, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ या विषयावर हा परिसंवाद होता.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख होते. यावेळी उपायुक्त विजयकुमार फड, प्रमुख वक्ते प्रा. बी.वाय. कुलकर्णी, अब्दूल हाफिज, रमेश खोत, अविनाश कव्हळे, कृष्णा तिडके, रवींद्र बांगड, प्रा. श्याम काबलेवाले, औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नायक पुढे म्हणाले की, पत्रकारांना जिल्ह्यातील प्रशासनाची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी एक प्रेसरूम सुरू करण्याची संकल्पना आहे. पत्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केले जातील, असेही नायक यांनी सांगितले.
उपायुक्त फड यांनी संतांचे कामही पत्रकारांसारखेच होते, असे सांगून काही उदाहरणे दिली. जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम पत्रकारांचे असून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांना ज्ञान देण्याचे पवित्र काम करून सत्याला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे फड यांनी सांगितले.
प्रा. कुलकर्णी यांनी पत्रकारिता म्हणजे खरे स्वातंत्र असल्याचे सांगून पत्रकारांनी केवळ इतिहास न मांडता किंवा त्यावर जास्त भर न देता वर्तमानावरील लिखाणावर भर द्यावा. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची व पत्रकारांनी त्यांची लेखणी हे उपजिविकेचे साधन असल्याने त्यांच्याशी इमान बाळगण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी देठे, हाफिज, कव्हळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप देशमुख यांनी पत्रकारांकडून मांडण्यात आलेल्या समस्यांवर प्रशासनाने दखल घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब डोंगरे यांनी केले. तर बेबीसरोज अंबिलवादे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील प्रमुख पत्रकार, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.