शॉर्टफिल्मसाठी प्रखर बुद्धिमत्ता आवश्यक - महाजन
By Admin | Updated: March 26, 2016 23:50 IST2016-03-26T23:50:30+5:302016-03-26T23:50:30+5:30
औरंगाबाद : तीन तासांचा चित्रपट बनवणे एकवेळ सोपे असते; परंतु कमी वेळेत मोठा संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते,

शॉर्टफिल्मसाठी प्रखर बुद्धिमत्ता आवश्यक - महाजन
औरंगाबाद : तीन तासांचा चित्रपट बनवणे एकवेळ सोपे असते; परंतु कमी वेळेत मोठा संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते, असे मत प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. कमलेश महाजन यांनी ‘औरंगाबाद क्लॅप शॉॅर्ट फिल्म फेस्टिव्हल’च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. क्लॅप फिल्म फाउंडेशन आणि गाथा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तापडिया नाट्य मंदिर येथे या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिव कदम, प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. संजय देवळाणकर, सत्यजित खारकर यांच्यासह रा. रं. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयोन्मुख कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी लघुचित्रपट बनवणाच्या कार्यशाळा आयोजित कराव्यात असा मुद्दाही महाजन यांनी उपस्थित केला. उद्घाटनप्रसंगी बोेलताना दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, मागची पिढी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत होती; परंतु आताच्या तरुण मनातील घुसमट बाहेर आणण्याचे काम शॉर्टफिल्म करत आहे. तुटपुंज्या साधनसामग्रीचा वापर करून अप्रतिम शॉर्टफिल्म बनवणाऱ्या दिग्दर्शकांचे आणि लेखकांचे कदम यांनी मनापासून कौतुक केले. त्याचबरोबर या फेस्टिव्हलमध्ये बक्षीस मिळवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याचे आश्वासनही दिले.
उद्घाटनानंतर सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या तसेच परखडपणे विचार मांडणाऱ्या शॉर्टफिल्म्स दाखवण्यात आल्या. या फिल्म शहर व देशभरातील कलाकारांतर्फे बनवण्यात आल्या होत्या. आजच्या सत्रात ‘रिसायकल’, ‘अक्स’, ‘१५ आॅगस्ट’, ‘एल अॅण्ड एफ फॉरएव्हर’, ‘आयडेंटीटी’, ‘बी ह्युमन’ यांसारख्या २२ शॉर्टफिल्म्स दाखवण्यात आल्या. प्रास्ताविक विनय जोशी यांनी केले. किशोर निकम यांनी आभार मानले. रविवारी सकाळी १० वाजेपासून तापडिया नाट्य मंंदिरात लघुचित्रपट दाखवण्यात येणार आहे. सायं. ५ वा. या महोत्सवाचा समारोप असून चित्रपट गीतकार तसेच लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते विजयी कलाकारांना पारितोषिके देण्यात येतील. प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. संजय देवळाणकर, सत्यजित खारकर या परीक्षण करणार आहेत.