कंत्राटी कामगारांना कायम करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST2021-06-28T04:05:46+5:302021-06-28T04:05:46+5:30
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कामगारांचे टाळ्या व थाळ्यांनी पोट भरत नाही. या कोविड योध्द्यांना नोकरीत कायम ...

कंत्राटी कामगारांना कायम करण्याची गरज
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कामगारांचे टाळ्या व थाळ्यांनी पोट भरत नाही. या कोविड योध्द्यांना नोकरीत कायम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी येथे केले.
आयटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संघटनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
डॉ. कांगो म्हणाले की, अतिशय तुटपुंजा पगारावर कथित कंत्राटी कामगार काम करत आहेत. सद्यस्थितीत शासनाने सर्व खर्च आरोग्यासाठी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या कामगारांना सामावून घेणे अवघड नाही. या अनुभवी कामगारांना व साथरोगाच्या काळात शासनास साथ देणाऱ्या कामगारांना सामावून घेऊन त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ॲड. अभय टाळसाळ, अजय सुरडकर, अभिजित बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विकास गायकवाड यांनी केले, तर महेंद्र मिसाळ यांनी आभार मानले.