स्वतंत्र बांधकाम विभागाची गरज
By Admin | Updated: May 9, 2014 00:23 IST2014-05-09T00:21:26+5:302014-05-09T00:23:01+5:30
सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका निर्मीतीला २२ वर्षे पुर्ण होत असताना तालुकास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग अद्याप कार्यान्वित झालेला नाही.

स्वतंत्र बांधकाम विभागाची गरज
सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका निर्मीतीला २२ वर्षे पुर्ण होत असताना तालुकास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग अद्याप कार्यान्वित झालेला नाही. तसेच स्वतंत्र उपविभाग नसल्याने तालुक्यातील रस्ते विकासाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका वगळता सर्व तालुक्याच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. सेनगाव तालुक्याची निर्मिती होवून २२ वर्षे पुर्ण झाली असताना तालुकास्तरीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय अद्याप या ठिकाणी कार्यान्वित झाले नाही. शासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा अभाव यामुळे तालुक्यासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग नसल्याने हिंगोली बांधकाम उपविभागामार्फतच तालुक्यातील रस्त्याची कामे होत आहेत. या सर्वांचा परिणाम तालुक्यातील रस्ते विकासावर झाला आहे. सेनगाव तालुक्यातील प्रमुख राज्य रस्त्याचे अद्याप रुंदीकरण झाले नसून अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्ते कामासाठी निधी मिळत नसल्याने विविध प्रमुख रस्त्याचे कामे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मिळालेल्या निधीत बोटावर मोजण्या इतके कामे तालुक्यात होत आहे. एका उपविभागात दोन तालुक्याचे मोठे कार्यक्षेत्र असल्याने तालुक्यातील रस्ते विकासावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील रस्त्यांच्या तुलनेत सेनगाव तालुका मोठ्या प्रमाणात मागे आहे. तालुक्यातील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र उपविभागाची गरज आहे. त्या करीता जबाबदार लोकप्रतिनिधी प्रभावी पाठपुरावा करून तालुक्यातील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. किमान २२ वर्षानंतर तरी सेनगाव येथे सा. बां. विभागाचे उपविभाग कार्यालय होण्याची तालुकावासियांना अपेक्षा आहे. (वार्ताहर)