वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रबोधन आवश्यक
By Admin | Updated: August 29, 2014 01:32 IST2014-08-29T01:10:07+5:302014-08-29T01:32:17+5:30
औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रबोधन आवश्यक
औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही. शंभर फुटी जालना रोडचा वापर ६० फुटांपर्यंतच होतोय. हे चित्र बदलून अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे प्रबोधन आवश्यक असून, त्या दृष्टीने नियोजित वाहतूक उद्यान उपयोगी ठरेल, असा विश्वास आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे व्यक्त केला.
सिद्धार्थ उद्यानात ते वाहतूक उद्यानाचे भूमिपूजन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर कला ओझा होत्या, तर मंचावर विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची उपस्थिती होती. राजेंद्र सिंह व कला ओझा यांनी शहरातील वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. डीएमआयसीबद्दल अभिमानाने बोलत असताना शेंद्रा भागातील वाढती अतिक्रमणे ही चिंतेची बाब होय. या अतिक्रमणाकडे लक्ष वेधत राजेंद्र दर्डा यांनी ही अतिक्रमणे वेळीच काढून टाकण्याचीही सूचना यावेळी केली. टीम औरंगाबादच्या माध्यमातून येत असलेल्या विविध सूचनांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शहरात पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वाहनधारकांकडून चुका होतात, असे ते म्हणाले.
प्रारंभी, नामफलकाचे अनावरण करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत या वाहतूक उद्यानाचे काम पूर्ण होऊन ते जनतेसाठी खुले करावे, असे सध्या तरी ठरले आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. डी.पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
असे राहील वाहतूक उद्यान....
गतवर्षी औरंगाबाद शहरात किरकोळ स्वरूपाचे तसेच गंभीर स्वरूपाचे जवळजवळ ७१२ अपघात झाले. तसेच यंदा गेल्या सहा महिन्यांत ३०० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सिद्धार्थ उद्यानात या वाहतूक उद्यानाची उभारणी करण्याचे ठरले.
या वाहतूक उद्यानात ४५ प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना- पर्यटकांना त्यांच्या वाहनाची गती किती असावी, वाहन रस्त्याच्या कुठल्या भागात थांबवायचे यासाठी थांबा फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय नो एंट्रीचा फलक, ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी, रेल्वेचे रूळ ओलांडताना काय काळजी घ्यावी, यासाठी सायकल किंवा पायी चालताना, शाळा- कॉलेजेस आले असता त्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, यासंबंधीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विविध ठिकाणी वाहतूक सिग्नलही बसविण्यात येणार आहेत.
या उद्यानात रेल्वे क्रॉसिंग, फ्लाय ओव्हरब्रिज, पादचारी मार्ग, अवघड वळण मार्ग व उंच बोगदा तयार करण्यात येणार आहे. आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी ही माहिती
दिली.
सध्या औरंगाबादमध्ये कार्यरत असलेली अधिकाऱ्यांची टीम चांगली आहे. त्यांच्यात योग्य समन्वय आहे. मनात आणले तर ते योग्य मार्ग काढून कामे करू शकतात, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात काढले.
या दोन्ही कामांसाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला
आहे.
४याकामी या सर्व अधिकाऱ्यांनी विशेष रुची घेतली, याचा राजेंद्र दर्डा यांनी विशेष उल्लेख करून ‘ही सारी टीम चांगले काम करीत आहे’ असे उद्गार काढले.
मंचावर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार व मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाहतूक उद्यानात व कमल उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातले, पाठपुरावा केला.