पर्यावरण संतुलनासाठी जनजागृती आवश्यक
By Admin | Updated: July 4, 2017 23:50 IST2017-07-04T23:46:24+5:302017-07-04T23:50:02+5:30
परभणी : पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, स्वच्छता, सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी केले.

पर्यावरण संतुलनासाठी जनजागृती आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, स्वच्छता, सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शिवा शंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर शिवा शंकर म्हणाले, ज्या साखर कारखान्यामुळे तलावातील मासे मरण पावल्याची घटना घडली, त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल चौकशी करावी, मास्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विविध नाल्यांमार्गामुळे होणारे प्रदूषण या विषयावर चर्चा झाली. शहरातील कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड पाच महिन्यात स्वच्छ केले जाणार असून त्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाने दिली. बैठकीस विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, प्राचार्या संध्याताई दुधगावकर, डॉ. एल. एन. जावळे, कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर, उद्योग व्यवस्थापक डी. आर. भगुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मायेकर, उपकार्यकारी अभियंता ए. बी. तुसे, शल्य चिकित्सक डॉ. अथर आदींची उपस्थिती होती.