खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज
By Admin | Updated: May 14, 2017 23:04 IST2017-05-14T23:03:23+5:302017-05-14T23:04:28+5:30
लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ तसेच या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे़ यंदाच्या हंगामात पेरणीसाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणांची आवश्यकता असून सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे लागणार आहे़
यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, कुळवणी आदी तीव्र उन्हातली कामे पूर्ण केली आहेत़ ज्या थोड्याफार शेतकऱ्यांची ही कामे शिल्लक राहिली आहेत, ते ही कामे पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात खरीपाचे साधारणत: साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे़
वेळेवर पाऊस होणार असल्याने बहुतांश शेतकरी सध्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची दुरुस्ती, जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणे आवश्यक असल्याचा अहवाल तयार करुन या बियाणांचा प्रस्ताव पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर केला आहे़ त्यापैकी ५४ हजार ८७ क्विं़ बियाणे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली़