बंदोबस्तात खड्डे खोदकाम
By Admin | Updated: May 7, 2014 00:39 IST2014-05-07T00:39:23+5:302014-05-07T00:39:39+5:30
वाशी : तालुक्यातील दहीफळ येथील वृक्षांची कत्तल करून वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.

बंदोबस्तात खड्डे खोदकाम
वाशी : तालुक्यातील दहीफळ येथील वृक्षांची कत्तल करून वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी गेले असता, ही मोही अडविण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे मंगळवारी दिवसभर १८ जेसीबीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दहीफळ, शेंडी, तांदुळवाडी, गोलेगाव, वाशी, ब्रह्मगाव, हातोला आदी ठिकाणी शासकीय जमिनीवर वन विभागाने वृक्ष लागवड केली आहे. परंतु, या वृक्षांची कत्तल करून अनेकांनी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकाराबाबत वन विभागाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. याची दखल घेत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कृती दलाचे ५० जवान, वाशी व कळंब येथील २५ पोलिस कर्मचारी व तीन अधिकार्यांसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ५० एकरावरील अतिक्रमण हटवण्यास मंगळवारी दहीफळ येथे सकाळीच दाखल झाले होते. सदरील पोलिस फौजफाटा पाहून एकही अतिक्रमणधारक तेथे थांबला नाही. अथवा मोहीम अडविण्यासाठीही आले नाहीत. त्यामुळे वन विभागाने तगड्या पोलिस बंदोबस्तात दिवसभर १८ जेसीबीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदकाम केले. यावेळी वाशीचे पोलिस निरीक्षक शहाजी शिंंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, पोलिस उपनिरीक्षक मारूती शेळके यांच्यासह वन विभागाचे कामाजी पवार, भूमच म्हेत्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर) वाशी तालुक्यातील दहीफळप्रमाणेच इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर शासकीय वनातील वृक्षतोड करण्यात येत आहे. वृक्षतोड करून जमिनी वहितीखाली आणल्या आहेत. या जमिनीवरील अतिक्रमणे कधी हटविणार असा, प्रश्न शेतकर्यांतून उपस्थित केला जात आहे.