राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST2017-09-12T00:46:43+5:302017-09-12T00:46:43+5:30
काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स लेन भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे होते़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद पठाण, जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, रामनारायण काबरा, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, मोहम्मद खॉ पठाण, जीवन घोगरे पाटील, महिला आघाडी शहराध्यक्षा कृष्णा मंगनाळे, डॉ़ शीला कदम, फेरोज खान यांची उपस्थिती होती़ मुंडे म्हणाले, काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचारविनिमय होऊ शकत होता, परंतु अद्यापही तसा प्रस्ताव आला नाही़ त्यामुळे आता राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केली आहे़ त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ भाजपचा दम, काँग्रेसचा खेळ सुरु आहे, हेही विसरता येणार नाही़ निवडणुकीत भाजपा ताकदीने उतरणार आहे़ काँग्रेसचीही अस्तित्वाची लढाई आहे़ सेनाही लढत आहे़ यामध्ये राष्ट्रवादी सर्वच पक्षांना सरस ठरण्यासाठी सक्षम असल्याचेही मुंडे म्हणाले़ तर प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, देशात कमळ, राज्यात कमळ, नांदेडात कमळ असे होर्डिंग्ज शहरात लावण्यात आले आहेत़ वास्तविक भाजपाने देशात चिखल केला आहे़ आता नांदेडातही चिखल करायचा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.