जि.प.साठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ?
By Admin | Updated: January 15, 2017 01:10 IST2017-01-15T01:10:19+5:302017-01-15T01:10:51+5:30
लातूर : काँग्रसे आणि राष्ट्रवादीच्या बिघाडीच्या चर्चा दररोज कानावर राज्यभरातून येत आहेत

जि.प.साठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ?
लातूर : काँग्रसे आणि राष्ट्रवादीच्या बिघाडीच्या चर्चा दररोज कानावर राज्यभरातून येत आहेत. मात्र भाजपाचा वारु रोखायला लातूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकीचा मंत्र घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आघाडीचा निर्णय हा जवळपास ठरला असून आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सोमवारी ‘आशियाना’वर अंतिम बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा परिषदेवर फडकणारा काँग्रेसचा झेंडा अबाधित ठेवण्यासाठी चाली रचण्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जिल्ह्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडल्याचे दिसते आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापसात संवादी भूमिका ठेवून प्राथमिक बोलणी केली आहेत. रविवारी दिवसभर प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापली मते मांडणार आहेत. यानंतर उद्या सोमवारी आशियानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आघाडीबाबत अंतिम बोलणी होणार आहे.
कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील यांनी भाजपात आमदार विनायकराव पाटील यांना घेऊन भाजपाला एका तालुका जोडला. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. आधीच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते आहे.
प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. आता जागा वाटप होऊन आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत दुजोरा देण्यास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला. आमचे ठरले की पत्रकार परिषद घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया एका राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली. परंतु, त्यांनी नकारही दिला नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता वाढली आहे. या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे़