शिवसेना-भाजपाच्या वादात राष्ट्रवादीला मिळाला लाभ

By Admin | Updated: March 14, 2016 00:29 IST2016-03-14T00:24:13+5:302016-03-14T00:29:04+5:30

वसमत : शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीने कोणाला फायदा व कोणाचे राजकीय नुकसान झाले याचे गणित लावण्यात येत आहेत.

NCP's gain in Shiv Sena-BJP dispute: | शिवसेना-भाजपाच्या वादात राष्ट्रवादीला मिळाला लाभ

शिवसेना-भाजपाच्या वादात राष्ट्रवादीला मिळाला लाभ

वसमत : शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीने कोणाला फायदा व कोणाचे राजकीय नुकसान झाले याचे गणित लावण्यात येत आहेत. ढोबळमानाने पाहिले तर सेना-भाजपाच्या वादात राष्ट्रवादीने मैदान मारल्याचेच चित्र आहे. भाजपाच्या आडून शिवसेनेला शह देण्याच्या खेळीत राष्ट्रवादी यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
वसमत तालुक्यातील राजकारणाची उलथापालथ करणारी निवडणूक म्हणून शिवेश्वर बँकेकडे पाहिले जात आहे. नगरपालिकेत सत्तेचे वाटेकरी असणारे व नगराध्यक्षपदाची वाटणी व्यवस्थित करून कारभार चालवणाऱ्या सेना-भाजपामध्ये ‘शिवेश्वर’च्या निमित्ताने वितुष्ट वाढले. यातही भाजपचा एक गट शिवसेनेसोबत राहिला, हे विशेष. नगरपालिकेत सत्तेत यशस्वी भागेदारी ठेवणाऱ्यांमध्ये वाद नेमका कशाचा होता, हे निवडणूक संपली तरी बाहेर आले नाही. ही धूसफूस पहिल्यापासूनच होती की, या निवडणुकीत जागा वाटपावरून बिनसले हेसुद्धा छातीठोकपणे सांगणे अवघड आहे. राष्ट्रवादीच्या जयप्रकाश दांडेगावकर यांनाच या निवडणुकीचा सर्वाधिक लाभ झाला. त्यांनी शिवेश्वरच्या निमित्ताने सेना-भाजपात झालेल्या वादात भाजपाचे शिवदास बोड्डेवार यांच्यामागे शक्ती उभी केली. पॅनलही निवडून आणला. पॅनलमध्ये सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचेच ठेवले व चेअरमन म्हणून शिवदास बोड्डेवार यांचे नावही पुढे करण्याची राजकीय खेळी खेळली. भविष्यात जेव्हा आ. डॉ. मुंदडा व दांडेगावकर- अ‍ॅड. जाधव यांच्यात संघर्ष होईल त्यावेळी त्यांच्या या खेळीचे अ‍ॅडव्हान्टेज मिळणार हे निश्चित. भाजपा- राष्ट्रवादी आघाडीच्या पॅनल म्हणून बॅनरवर दांडेगावकर व भाजपचे नेते अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांचे फोटोही एकत्र झळकले. हे चित्रही आगामी निवडणुकांत परिणाम करणारे ठरणार आहे. अ‍ॅड. जाधव हे दांडेगावकरांचे कट्टर विरोधक असल्याचे चित्र रंगत असतानाच दोघांचे एकीच बॅनरवर फोटो झळकल्याने दांडेगावकरांचा विरोध म्हणून जे अ‍ॅड. जाधवांच्या तंबूत गेले होते तेही आता विचारात पडले आहेत. तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या टोकाई कारखाना व जवळा बाजार समितीतही हे चित्र राहते काय? जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विरोधक कोण? आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका राहील आदी प्रश्नांची मालिकाच ‘शिवेश्वर’ ने उभी केली आहे. अ‍ॅड. जाधव यांनाच सर्वाधिक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार असल्याने त्यांची दमछाक होणार हे निश्चित. जाधव यांच्या उमेदवारीमुळेच दांडेगावकरांचा पराभव झाला होता, हे अंतिम सत्य आहेण् दांडेगावकरही हे विसरणाऱ्यांपैकी नाहीत. त्यामुळे ‘शिवेश्वर’चा अ‍ॅड. जाधव यांना लाभ होणार की नुकसान? हे पुढे ठरणार आहे. मुंदडा यांनी विधानसभा स्वबळावर लढवली होती. पुढेही तीच तयारी राहणार आहे. मात्र नगर पालिकेच्या युतीवर परिणाम होणार हे निश्चित. शिवाय वारंवार ते विविध निवडणुकांत हात घालून विरोधक वाढविण्याचेही एकप्रकारे काम करीत आहेत. ‘शिवेश्वर’वर कोणाचा झेंडा लागला हे सांगणे अवघड आहे. मात्र नगरपालिका निवडणुकांत सेना-भाजपाचा झेंडा लागण्यावर प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादीचे मात्र सर्वच पातळ्यांवर ‘बल्ले- बल्ले’ दिसत आहे. वरकरणी एका बँकेची साधारण निवडणूक झाली असली तरी या निवडणुकीने राजकारणाची गणिते बदलल्या गेली आहेत. कोण कोणाचा आहे? व कोण कोणाबरोबर भविष्यात राहील? हेच एक कोडे निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: NCP's gain in Shiv Sena-BJP dispute:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.