राष्ट्रवादीची काँग्रेस-सेनेला धोबीपछाड !
By Admin | Updated: March 22, 2017 00:33 IST2017-03-22T00:32:07+5:302017-03-22T00:33:11+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी रस्सीखेच अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.

राष्ट्रवादीची काँग्रेस-सेनेला धोबीपछाड !
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादीसह काँग्रस-शिवसेनेकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. या दोघांमधील रस्सीखेच अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. अप्रत्यक्षरित्या भाजपाच्या सहकार्याने अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव गटातील नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची वर्णी लागली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत प्रचंड जल्लोष केला. या जल्लोषामुळे जिल्हा परिषद परीसर अक्षरश: दणाणून गेला होता.
जिल्हा परिषदेच्या कैै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरूवात झाली. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उपरोक्त दोन्ही पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकरण्यात आली. त्यानुसार शिवसेना-काँग्रेसकडून भूम तालुक्यातील सुकटा गटातील छाया कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून कैैलास पाटील यांचे नाव होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेताजी पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून दत्ता देवळकर यांचे नाव होते. तर दुसरीकडे उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस-शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचे महंमद रफी महेमूद तांबोळी यांनी उमेदवारी दाखल केली असता राष्ट्रवादीने आ. राणा पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली. यांच्या अर्जावर सूचक म्हणून मदन बारकूल यांचे नाव होते. दुपारी २ ते २.१५ या वेळेत प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत सर्व अर्ज पात्र ठरले. त्यानंतर दुपारी २.१५ ते २.३० हा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला. परंतु, एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले नाही. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना-काँग्रेस अधी थेट लढत झाली. निवडणूक रिंगणामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने हात उंचावून मतदान घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार प्रत्येक पक्षाचे सदस्य सभागृहात हजर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व २६ सदस्य सभागृहात दाखल झाले. तसेच काँगे्र्रसचे सर्व १३, शिवसेनेचे ११ पैैकी नऊ सदस्य उपस्थित राहिले तर दोघे गैर हजर राहिले.
यामध्ये उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेखर घंटे व लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील चंद्रकला नारायणकर यांचा समावेश आहे. ज्या भाजपाच्या भरवशावर शिवसेना-काँग्रेसने तयारी केली होती. अखेरच्या क्षणी सर्व चारही सदस्य सभागृहात गैैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेसह काँग्रेसच्या मनसुभ्यावर पाणी फेरले गेले. हात उंचावून मतदान घेण्यात आले असता राष्ट्रवादीचे नेताजी पाटील यांना २६ तर छाया कांबळे यांना २३ मते मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी अध्यक्षपदी नेताजी पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठीही मतदान घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना २६ तर काँग्रेसचे महंमद रफी महेमूद तांबोळी यांना २३ मते मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अर्चनाताई पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आणि गुलालाची उधळण करून प्रचंड जल्लोष केला. त्यामुळे जिल्हा परिषद परिसर अक्षरश: दुमदुमून गेला होता. या आनंदोत्सवात आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे हेही सहभागी झाले होते.