राष्ट्रवादीचे आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित
By Admin | Updated: September 3, 2016 00:28 IST2016-09-03T00:22:50+5:302016-09-03T00:28:44+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाई, पिकांचे पंचनामे, प्रलंबीत अनुदान, बळीराजा चेतना अभियानाकडे प्रशासनाकडून होत असलेला कानाडोळा

राष्ट्रवादीचे आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित
उस्मानाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाई, पिकांचे पंचनामे, प्रलंबीत अनुदान, बळीराजा चेतना अभियानाकडे प्रशासनाकडून होत असलेला कानाडोळा यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार होते़ मात्र, पालकमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून वरील प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याने राष्ट्रवादीने हे आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित केले आहे़ शासन-प्रशासन प्रलंबीत प्रश्नाबाबत काय कार्यवाही करते ? हे पाहून त्यानंतर पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले़
शुक्रवारी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ १९ आॅगस्ट रोजी निवेदन देवून कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा तसेच पाणीटंचाई निवारणार्थ बैठक बोलाविण्याची विनंती केली होती़ त्यानंतर २९ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पालकमंत्री, कृषीमंत्र्यांसह संपर्क मंत्र्यांनी जिल्ह्यात येवून बैठका घ्याव्यात आणि प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता़ राज्य शासनाने दुष्काळ निवारणार्थ ५५० कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे़ मात्र, याबाबतचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही़ टँकर अधिग्रहण बंद केल्याने अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, पिकांचे पंचनामे प्रलंबीत अनुदान आदी प्रश्न कायम असल्यानेच राष्ट्रवादीने आंदोलनाची भूमिका घेतली होती़ मात्र, पालकमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी गुरूवारी बैठक घेवून विविध प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला़ प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत़ तसेच बाधित क्षेत्राचा अहवाल १५ दिवसात देणे क्रमप्राप्त असताना महसूल व कृषी विभागाने कार्यवाही केलेली नाही़ नुकसानीची २५ टक्के रक्कम एक महिन्यात आगावू देण्याचे शासनाचे धोरण असताना त्याकडेही कानाडोळा केल्याचा मुद्दा उपस्थित केला असता शनिवारपासून पंचनामे सुरू करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबरोबरच आवश्यक तेथे टँकर आणि अधिग्रहण करण्याच्या सूचनाही दिल्या़ २०१५-१६ चा जिरायती पीकविमा तातडीने देण्याची ग्वाही देण्यात आली असून, बागायती तसेच फळपिकांच्या अनुदानाचा प्रश्न आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावर असून, याबाबत आठड्यात माहिती देवू, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले़ महाराष्ट्र बँकेकडे १४६ गावे दत्तक आहेत़ मात्र, या बँकेकडून कसलेही कर्जवाटप केले जात नाही़ यामुद्द्यावर सदर गावे इतर बँकांना दत्तक देण्याबाबतची कार्यवाही करू, असे पालकमंत्र्यांनी सांगत पीककर्ज व्याज पडताळणीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ (प्रतिनिधी)
५५० कोटीचे विशेष पॅकेज कसे वापरणार? याचे सादरीकरण करण्याचे निर्देश शासनाने दिले होते़ मात्र, जिल्हा प्रशासनाने याबाबतही कानाडोळा केला़ आता यासंबंधी १५ दिवसात बैठक घेण्याचे तसेच ठोस कार्यक्रम सादर करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे़ बळीराजा चेतना अभियानच्या नियमित बैठका घेवू, असा शब्दही दिला असल्याचे ते म्हणाले़ तेर, ढोकी, तडवळा, येडशी या तेरणा प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना पाणी कुठून आणायचे ? याबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिल्याने आश्वासनानुसार कार्यवाही होते की नाही ते पाहून आंदोलनाबाबतचे पुढील धोरण ठरवू, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.