राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा अजित पवार घेणार क्लास !
By Admin | Updated: March 24, 2017 00:21 IST2017-03-24T00:20:39+5:302017-03-24T00:21:32+5:30
लातूर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजायच्या आधीच सर्व पक्ष कामाला लागले आहेत.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा अजित पवार घेणार क्लास !
लातूर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजायच्या आधीच सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मात्र आचारसंहिता घोषित होताच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांंची बैठक घेऊन चर्चा केली. शिवाय सर्व नगरसेवक हे मुंबईवारीला पाठविले असून शुक्रवारी स्वत: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाच्या नगरसेवकांचा निवडणूकपूर्व क्लास घेणार आहेत.
लातूर महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचे १३ सदस्य निवडून आले होते. यातील दोन सदस्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. उरलेले ११ सदस्य अद्याप तरी राष्ट्रवादीत आहेत. ही पडझड रोखण्याच्या दृष्टीने आचारसंहितेची घोषणा होताच आ. राणा पाटील यांनी लातुरात येऊन पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पारिजात मंगल कार्यालयात तातडीची बैठक घेतली. शिवाय मागच्या पाच वर्षात पक्षाने काय केले ? व आगामी निवडणुकीत कसे सामोरे जायचे ? याविषयी चर्चा केली.
या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अचानक मुंबईला रवाना झाले. या नगरसेवकांशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या चर्चा करणार आहेत. महापालिका निवडणुकीची दिशा या बैठकीत ठरणार आहे़ आघाडीबाबतही अजित पवार विद्यमान नगरसेवकांची मते जाणून घेणार असल्याचे मुंबईला रवाना झालेल्या नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लातूर मनपात सध्या राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक आहेत़ त्यापैकी दोन नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे़ प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतत चर्चेत राहिले़ यापेक्षा अधिक यश होऊ घातलेल्या निवडणुकीत मिळविण्यासाठी अजित पवार या नगरसेवकांना क्लासमध्ये काय टिप्स देतात, याकडे लक्ष लागलेले आहे़