भाजपाला डीसीसी निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास तर राष्ट्रवादी निरूत्साहीच
By Admin | Updated: April 20, 2015 00:36 IST2015-04-20T00:19:44+5:302015-04-20T00:36:13+5:30
शिरीष शिंदे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असून, भाजपाने बँकेवर ताबा मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीचा निरूत्साह कायम आहे.

भाजपाला डीसीसी निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास तर राष्ट्रवादी निरूत्साहीच
शिरीष शिंदे, बीड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असून, भाजपाने बँकेवर ताबा मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीचा निरूत्साह कायम आहे.
डीसीसीच्या निवडणुकीसाठी पाच मे रोजी मतदान होणार आहे. सोसायटीच्या ११, महिलांच्या २, वि.जा.भ.ज. साठी १, अनुसूचित जाती-जमातीसाठी १, इतर मागासवर्गीय १, पगारदार, पतसंस्था १, प्रक्रिया १ व इतर १ अशा १९ जागांसाठी मतदान होत आहे. सद्य परिस्थिती पाहता जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक बिनविरोध निघण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.
दरम्यान, गेवराई, बीड, आष्टी, पाटोदा, वडवणी येथील संस्था मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर परळी, केज, धारूर, अंबाजोगाई येथे राष्ट्रवादीला भाजपाशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. प्रक्रिया १, इतर शेती संस्था १ व नागरी बँक १ यासाठी मोठी लढत होणे अपेक्षित आहे. उर्वरित महिला, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी या पाच जागांसाठी सर्वांचे मतदान असणार आहे. एकंदरीत आढावा घेतला तर भाजपाचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे.
डीसीसी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार निरूत्साही दिसून येत आहेत. राकाँने निवडणुकीसाठी पॅनल तयार केले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या भागातून अर्ज दाखल केले आहेत. डीसीसी निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १६२ उमेदवार आहेत. २४ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परंतु शनिवारपर्यंत अद्याप एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नव्हता. पुढील चार दिवसांमध्ये कोण अर्ज मागे घेतो हे समजून येईल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, सोसायटीसाठी ६९९, इतर शेतीसाठी ५२८, प्रक्रियाचे ६५, पगारदार पतसंस्थेचे १३२ असे मिळून १ हजार ४२४ मतदार डीसीसीच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.
राष्ट्रवादी व भाजपा पक्षातील अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे डीसीसीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.