छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने महायुतीमध्ये भाजपकडून जागा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे पहिल्यापासूनच प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी इतर पक्षांमधील आयात उमेदवारांनाही टिपण्यात आले होते. त्या माध्यमातून किमान ८ ते १० जागा निवडून आणत महापालिकेत ‘किंगमेकर’ची भूमिका वठविण्याचे मनसुबे रचण्यात आले होते. मात्र, भाजपा आणि एमआयएमच्या वादळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला खातेही उघडता आले नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाय रोवता आलेले नाहीत. मात्र, पक्षाच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी नोंदविली होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षाचे पदाधिकारी ॲड. दत्ता भांगे, डॉ. मयूर सोनवणे, प्रा. सुनील मगरे यांच्या पत्नी डॉ. चारूलता मगरे, अंकिता विधाते यांच्यासह जनमानसात ओळख असलेल्या काही आयात उमेदवारांना ताकद देण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केला होता. त्याशिवाय पक्षवाढीसाठी प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतल्या. त्याशिवाय आमदार चव्हाण, शहराध्यक्ष देशमुख यांनीही प्रत्येक प्रभागात बैठका, कॉर्नर सभा घेत वातावरण निर्मिती केली होती. त्यातून १२ ते १३ उमेदवार हे स्पर्धेत असल्याचा दावाही करण्यात येत होता. त्यातील किमान ६ ते ८ उमेदवार विजयी होत महापालिकेच्या सत्ताकारणात किंगमेकर ठरण्याची मनीषा बाळगून होते. मात्र, भाजप आणि एमआयएमच्या वादळात पक्षाला खातेही उघडता आलेले नाही.
२०१७ मध्ये ४ जागांवर विजयसन २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी झाले होते. मात्र, यावेळी अजित पवार गटाला खातेही उघडता आलेले नाही, हे विशेष.
Web Summary : Ajit Pawar's NCP aimed to be kingmaker in Sambhajinagar's municipal elections by fielding candidates, but failed to win any seats amidst BJP and MIM dominance, a stark contrast to their earlier hopes.
Web Summary : अजित पवार की राकांपा का लक्ष्य संभाजीनगर नगर निगम चुनावों में उम्मीदवार उतारकर किंगमेकर बनना था, लेकिन भाजपा और एमआईएम के प्रभुत्व के बीच कोई भी सीट जीतने में विफल रही, जो उनकी पहले की उम्मीदों के विपरीत है।