बेकारीतून उगवेल नक्षलवाद

By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:40:39+5:302015-02-03T00:58:20+5:30

उस्मानाबाद : शेती संबंधीची धोरणं चुकीच्या पद्धतीने राबविल्याने आत्महत्येसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खोटी आसवे ढाळून अथवा नाटकबाजी करून प्रश्न संपणार नाहीत,

Naxalism arises from unemployment | बेकारीतून उगवेल नक्षलवाद

बेकारीतून उगवेल नक्षलवाद

 

उस्मानाबाद : शेती संबंधीची धोरणं चुकीच्या पद्धतीने राबविल्याने आत्महत्येसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खोटी आसवे ढाळून अथवा नाटकबाजी करून प्रश्न संपणार नाहीत, तर आत्महत्या थांबविण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे लाभ पोहोचवावे लागतील. गरीब-श्रीमंतामध्ये वाढत असलेल्या दरीतून बेकारीचा जन्म होतो. परिस्थिती अशीच राहिल्यास आपल्यापुढेही नक्षलवादासारखा प्रश्न उभा राहू शकतो, असा गंभीर इशारा माजी आमदार पाशा पटेल यांनी दिला.
तालुक्यातील पळसप येथील शि.म. वसंतराव काळे साहित्यनगरीत प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘शेतकरी आत्महत्या-एक समस्या’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. मंचावर प्रा. गणेश बेळंबे, आ. विक्रम काळे यांची उपस्थिती होती. सहावा आला...सातवा आला..आता आठवा वेतन आयोग येतोय. कोणाला फायदा मिळत असेल, तर त्याबद्दल आनंदच आहे. मात्र एकाच्या कष्टाची किंमत महिन्याकाठी ७० ते ८० हजार होणार असेल, आणि दुसरा दिवस-रात्र कष्ट करूनही दोन घास भाकरीपासून वंचित राहणार असेल तर ही परिस्थिती देशातील सामाजिक स्थैर्य बिघडवणारी ठरू शकते, त्यातून गंभीर समस्या जन्म घेतील, असे परखड प्रतिपादन पटेल यांनी यावेळी केले.
मी शेतकरी आत्महत्येचा विषय अभ्यासातून..शेतीच्या अनुभवातून मांडत आहे. २५ एकर शेती पाच वर्षे कसली. त्यातून जे भोगलं, ते समाजासमोर आणण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढत राहिलो. माझ्याही मनात आत्महत्येसारखे विचार आले होते. मात्र आत्महत्या हे नामर्दपणाचं लक्षण आहे. त्यामुळे मरायचं नाही..मारायचं ठरवलं, अन् गेली कित्येक वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडत आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, त्याही अगोदर भाव काढण्याची पद्धत बदलली पाहिजे. मागील काही वर्षात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. कृषिमूल्य निश्चितीकरण आयोगाचा सदस्य म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने आम्ही दिलेल्या ७० टक्के शिफारसी स्वीकारल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतीमालाचा खर्च लावताना बैलाची मजुरी १३ दिवस ठरविली जाते. हे वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु १३ दिवसच का? असा प्रश्न त्यांना कोणी विचारला नाही. मालाच्या किंमती ठरविताना असा नंगानाच सुरू असल्याने प्रश्न गंभीर झाल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी प्रा. गणेश बेळंबे यांनी मांडणी केली. शेतकऱ्यांनी दैववादाचा, अंधश्रद्धेचा त्याग करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. समाजाची मानसिकता चंगळवादी बनल्याने प्रश्नांचा गुंता वाढत आहे. गावातील उत्कृष्ठ शेतकरी सांगा म्हटले तर कोणालाच सांगता येणार नाही. मात्र चित्रपट, क्रिकेटची सणावारी, आकडेवारी बिनचूक सांगता येते. अशा वातावरणात घरात उत्कृष्ठ शेतकरी जन्माला यावा, असे कोणाला वाटेल? हे सर्व बदलावे लागेल. केंद्राच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचा एकही प्रतिनिधी का नव्हता? असा सवाल करीत बॅटऱ्यांच्या उजेडात झालेली पाहणी शेतकऱ्यांची चेष्टा करणारी होती, अशी टिकाही बेळंबे यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)
शिक्षित कर्मचारी नोकराला कुशल म्हणून त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो. तर शेतकऱ्याला अकुशल समजून आजपर्यंत त्याच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. या भेदामुळेच शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. समता, न्याय, बंधूता या तिन्ही तत्त्वांना यामुळे सुरूंग लागल्याचे सांगत हे चित्र बदलण्यासाठी कृषी मुल्य आयोगाच्या माध्यमातून आपला लढा सुरू असल्याचे व त्याला काही प्रमाणात यश मिळत असल्याची माहितीही पटेल यांनी यावेळी दिली.
४नोकरी लागली की भाऊ वेगळा होतो. यातून पुन्हा आर्थिक दरी रूंदावते. मात्र, आपण जात असलेली दिशा चुकीची तसेच विनाशाकडे जाणारी आहे. गावातील आपल्या शेजारच्या माणसाच्या पोटात अन्न गेले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी यापुढे आपणाला स्वीकारावी लागेल. तरच समाजातील शांतता अबाधित राहील, असेही पटेल यांनी यावेळी सांगितले.
आपल्या सामाजिक इतिहासात शेतकऱ्यांची लूटमार उघडपणे सुरू असल्याचे दिसते. समाजाच्या गरजा वाढल्या आहेत. आणि काही वाढविल्या गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या खऱ्या गरजांइतकाच खर्च केला पाहिजे. अवास्तव वाढविलेला खर्च भागविताना दमछाक होते. या दमछाकीतून आपण आपली क्रयशक्ती गमावली असून, पर्यायाने आत्मविश्वास ढासळल्याने शेतकरी आत्महत्येच्या वाटेने जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी शेती संबंधीच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन भांडण्याची गरज आहे. बळीराजा आणि शिवाजी राजा या दोघांच्याच कार्यकाळात शेतकरी सुखी होता. शेतकऱ्यांनी निराश न होता तुकारामाची गाथा, आज्ञापत्र आणि महात्मा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ही तीन पुस्तके वाचावीत, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिवे यांनी दिला. जाती-धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण केली जाते. ही बाब शेतकऱ्यांसह समाजासाठी घातक असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Naxalism arises from unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.