नव्वद लाखांची कामे गोंधळामध्ये मंजूर

By Admin | Updated: May 20, 2017 23:35 IST2017-05-20T23:31:43+5:302017-05-20T23:35:18+5:30

उमरगा : येथील नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण २५ ठरावांना मंजुरी देण्यात आली

Nawabs lakhs work in confusion | नव्वद लाखांची कामे गोंधळामध्ये मंजूर

नव्वद लाखांची कामे गोंधळामध्ये मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : येथील नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण २५ ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्यात आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम यासह विविध विभागासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसह ९० लाखाच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, यावेळी सेना व राष्ट्रवादीचेही काही कार्यकर्ते सभेसाठी आले होते. परंतु, अध्यक्षांची परवानगी नसल्याने त्यांना सभागृहातून बाहेर जावे लागले. यावरून काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी शहरासाठी माकणी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतील समुद्राळ येथील फिल्टरचे गेअर दुरुस्ती व खरेदी करणे, कोरेगाव जॅकवेलची मोटार खरेदी, पिस्के प्लॉट येथे पाण्याची टाकी बांधणे, शहरासह हद्दवाढ भागातील आवश्यक त्या ठिकाणी मुरुम टाकणे, मलंग प्लॉट येथील जुनी पाण्याची टाकी पाडून नवीन ७ लाख लिटरची पाण्याची टाकी बांधणे, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट करणे, सार्वजनिक शौचालयांना लोखंडी दारे बसवणे, शहरातील नगरपालिकेच्या सर्वच खुल्या जागेवर कुंपण बसवणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, काँग्रेस गटनेते आतिक मुन्सी, शिवसेनेचे गटनेते संतोष सगर, राष्ट्रवादीचे गटनेते संजय पवार, भाजपा गटनेते गोविंद घोडके यांच्यासह सत्ताधारी व विरोधातील सर्वच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी हद्दवाढ भागातील नागरिकांचे बेटरमेंंट व विकास कर भरणा केलेल्या नागरिकांच्या रिवीजनला नाव नोंद करणेबाबत विचारविनीमय करण्यात आला. संबंधित नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करावा, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते. सदरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी केले होते. त्यानुसार दोन्ही पक्षाचे समर्थक, कार्यकर्ते सभागृहात आले होते. परंतु, यासाठी नगराध्यक्षांची परवानगी नसल्याने पदाधिकारी व कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणीही सभागृहात थांबू नये, अशा सूचना नगराध्यक्षांनी केल्या. यावरून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी गोंधळ घालून जनतेसाठी सभागृह खुले असले पाहिजे असा हट्ट धरला. त्यानंतर नगराध्यक्षांची लेखी परवानगी घेतली नसल्याने त्यांना सभागृहात थांबता येत नाही, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्याने कार्यकर्त्यांनी सभागृह सोडले. यावेळी नागरिकांना सभेसाठी येण्याचे आवाहन करणारे व सभा रद्द करण्याची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय पवार व शिवसेनेचे गटनेते संतोष सगर यांनी सभागृहात बसणेच पसंत केले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर राष्ट्रवादी-सेनेने आंदोलन स्थगित केले.

Web Title: Nawabs lakhs work in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.