अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार; १७ जणांना पदोन्नती
By Admin | Updated: August 11, 2014 01:56 IST2014-08-11T01:39:15+5:302014-08-11T01:56:50+5:30
औरंगाबाद : महसूल खात्यातील १७ अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी पदोन्नतीचे आदेश जारी केले.

अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार; १७ जणांना पदोन्नती
औरंगाबाद : महसूल खात्यातील १७ अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी पदोन्नतीचे आदेश जारी केले. या नियुक्त्या सरळ सेवेच्या कोट्यातील जागांवर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असणार आहेत.
मराठवाड्यात महसूल खात्यांतर्गत नायब तहसीलदारांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नती आणि सरळ सेवा अशा दोन्ही संवर्गातून भरली जातात. गतवर्षी विभागात पदोन्नतीने नायब तहसीलदारांची काही पदे भरण्यात आली. तरीही सरळ सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतील १७ जणांना तात्पुरत्या स्वरूपात या पदांवर पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ७, जालना जिल्ह्यातील ३, नांदेड जिल्ह्यातील १, बीड जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ आणि लातूर जिल्ह्यातील १ अव्वल कारकून नायब तहसीलदार बनले आहेत.
मात्र, या पदोन्नत्या तात्पुरत्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने नियुक्ती आदेशात स्पष्ट केले आहे. सरळ सेवेच्या कोट्यातील पदांवर लोकसेवा आयोगाकडून उमेदवार प्राप्त होईपावेतो किंवा निव्वळ ११ महिन्यांकरिता यापैकी जो आधी घडेल त्या कालावधीकरिता या नियुक्त्या असणार आहेत. वरीलपैकी कोणतीही एक गोष्ट घडल्यानंतर सदर पदोन्नत्या संपुष्टात येतील.
तात्पुरत्या पदोन्नत्या मिळालेल्यांमध्ये व्ही. टी. पाटील, पी. एच. आवटे (उस्मानाबाद), डी. एम. कांबळे (लातूर), युसूफजई समिउल्ला खान, एस. एस. रामदासी, सचिन वाघमारे (बीड), रफिक बशिरोद्दीन (नांदेड), सी. व्ही. जोशी, के. डी. सोनवणे, व्ही. पी. दावणगावकर (जालना), छाया चौधर, रजनी लोखंडे, व्ही. जी. देशमुख, डी. एन. पवार, मोहंमद नूर, महंमद सलीम आणि ए. जी. कापसे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे.