कन्नड तालुक्यावर निसर्ग कोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST2021-09-27T04:04:32+5:302021-09-27T04:04:32+5:30

कन्नड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरत्या हंगामाची वाट लागल्याने शेतकरी हताश झाले असून ...

Nature is angry with Kannada taluka | कन्नड तालुक्यावर निसर्ग कोपला

कन्नड तालुक्यावर निसर्ग कोपला

कन्नड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरत्या हंगामाची वाट लागल्याने शेतकरी हताश झाले असून कर्ज कसे फेडावे, रब्बीच्या पेरणीसाठी पैसा कुठून उभा करावा, अशी चिंता आता त्यांना सतावू लागली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. नंतर २२ जुलै ते १७ ऑगस्ट असा २५ दिवसांचा मोठा खंड पडल्याने पाण्याअभावी खरीप पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले होते. नंतर पाऊस आल्यानंतर दिलासा मिळाला आणि कोमेजलेली पिके तरारली. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फार काळ टिकला नाही. कधी अतिवृष्टी तर कधी संततधार पडलेल्या पावसाने नद्यांना महापूर आले. नदीकाठच्या शेतीवर संक्रांत आली. पाण्यासाठी आसुसलेल्या जमिनीतून नितळ स्वच्छ पाणी वाहू लागले. या अतिवृष्टीने खरीप पिकांची वाट लागली असून तालुक्यात ओला दुष्काळ पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नगदी पीक असलेली आद्रक अतिपावसाने सडू लागली आहे. कपाशीच्या मुळ्या सडल्याने झाडे सुकत आहेत. उडीद, सोयाबीनला कोंब फुटू लागले, तर मक्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. काढणीसाठी आलेली बाजरीची अवस्थाही वाईट आहे. अति पावसाने विहिरीही खचू लागल्याने आगामी काळात शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था कोलमडणार आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ६७२.७२ मि.मी. असताना रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एक हजार मिमी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांनी सरासरी ओलांडली आहे. सर्वच नदी-नाले खळखळून वाहत असून धरणे ओसंडली आहेत.

चौकट

पंचनामे सुरूच

दररोज पडणाऱ्या पावसामुळे पीक नुकसानीच्या क्षेत्रात भर पडतच आहे. तर विहिरी खचण्याच्या आणि घरे पडण्याच्या संख्येतही भर पडत आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा काढणे प्रशासनाला अवघड झाले आहे. शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी जि.प.च्या माजी सदस्या संजना जाधव यांनी केली आहे. तसेच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून आधार देणे गरजेचे असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील म्हणाले.

चौकट

महसूल मंडळनिहाय पडलेला एकूण पाऊस

कन्नड -१२२४ मिमी., चिंचोली -११८५, करंजखेडा-११४३, पिशोर- १०७५, नाचनवेल-९५४, चापानेर- ८८३, देवगाव- ७९९, चिकलठाणा-७७६ मि.मी.

Web Title: Nature is angry with Kannada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.