राष्ट्रवादी काँग्रेसचा धूमधुडाका : सर्वांगांनी प्रचार व प्रसार
By Admin | Updated: July 4, 2014 01:11 IST2014-07-04T00:57:05+5:302014-07-04T01:11:58+5:30
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत प्रचारातील पिछाडीने वर्मी बसलेल्या पराभवातून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार व प्रसारासह जनजागृतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा धूमधुडाका : सर्वांगांनी प्रचार व प्रसार
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत प्रचारातील पिछाडीने वर्मी बसलेल्या पराभवातून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार व प्रसारासह जनजागृतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच विंग यासाठी काम करीत आहेत.
नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदभार सांभाळताच जिल्हावार मेळावे घेण्यास प्रारंभ केला आहे. औरंगाबादेत जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संयुक्त जिल्हा मेळावा होऊ घातला आहे. कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यात सुसंवाद साधण्याचे काम या मेळाव्यातून हाती घेतले आहे.
सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांना दिले जाते आहे. यासंदर्भातील एक कार्यशाळा नुकतीच राष्ट्रवादी भवनात पार पडली. सोशल मीडियाचा कल्पक व आक्रमक वापर करून भाजपाने लोकसभा निवडणुकीत विरोधकांवर मात केली होती. यातून धडा घेत राष्ट्रवादीने टेक्नोसॅव्ही तणांना जवळ करणे सुरू केले आहे. जे तरुण सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांना सोशल मीडियाचा पक्षासाठी कसा वापर करता येईल, याचे धडे देणे सुरू केले आहे. सोशल मीडिया कार्यशाळेत याची चुणूक दिसली. या कार्यशाळेतून तयार झालेल्या, चांगले आशयसंपन्न मॅसेज देणाऱ्या तीन तरुणांना लोकसभेचे अधिवेशन पाहण्याची संधी पक्षाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी दिली. यासह खा. सुळे यांच्या वाढदिवसापासून (दि. ३० जून) ते अजित पवार यांच्या वाढदिवसापर्यंत (दि.२२ जुलै) राष्ट्रवादी विद्यार्थी मतदार नोंदणी अभियान राबवीत आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्य्यांची मतदार नोंदणी करून घेतली जाते आहे.
जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी सांगितले की, आमच्या पक्ष शाखा मजबूत आहेतच; परंतु त्यांना आणखी ताकद देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना अधिक शक्ती प्रदान केली जाते आहे. त्यासाठी प्रत्येकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन संवाद साधला जात आहे. वरिष्ठ नेते आघाडीसंदर्भात चर्चा करीत आहेत. आमच्याकडे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कन्नड व वैजापूर विधानसभा आम्ही अत्यंत कमी फरकाने गमावल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतून आम्ही ताकद वाढवीत आहोत. आघाडी झाली नाही तर तेथून उमेदवारांना लढणे शक्य व्हावे, यासाठी यंत्रणा उभी केली जात आहे. मोदी यांनी सत्तेवर येताना देशातील जनतेला दाखविलेली प्रलोभने व आता त्यांच्या कृतीतील विसंगती आम्ही जनतेला पटवून देत आहोत. शालीनतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचे ३५ टक्के खासदार गुन्हेगार असल्याचे जनतेसमोर उघड करीत आहोत. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर योग्य व अधिक प्रमाणात केला जात आहे.
आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड हे ‘कॉफी वुईथ स्टुडंटस्’ ही मोहीम राबवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. गेल्या आठवड्यात आव्हाड यांनी घाटी रुग्णालयात येऊन तरुणांशी मनमोकळा संवाद साधला होता. सोशल मीडियावरील स्पर्धा, कार्यशाळांसह अनेक मोहिमा सध्या राष्ट्रवादीतर्फे राबविल्या जात आहेत.