राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था
By Admin | Updated: May 22, 2017 23:39 IST2017-05-22T23:36:52+5:302017-05-22T23:39:36+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील तुळजापूर ते उमरगा या दरम्यानचा मार्ग अत्यंत खराब झाला आहे़

राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील तुळजापूर ते उमरगा या दरम्यानचा मार्ग अत्यंत खराब झाला आहे़ वाहन चालकांना जीव मुठीत घेवून या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी केली आहे.
तुळजापूर-उमरगा या दरम्यान रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. विशेष म्हणजे सदर कामात मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्डे आणि कंत्राटदाराकडून नुतनीकरणासाठीचे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच टाकले आहे़ त्यामुळे या महामार्गावर मागील काही वर्षात अपघात अपघातात वाढ झाली आहे़ अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवीन डांबरीकरणाचे कामही दर्जेदार झालेले नसल्याने वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हद्दीबाहेर जाणाऱ्या याच महामार्गाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असताना तुळजापूर-उमरगा महामार्गाची अशी दुरवस्था का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नवगिरे यांनी केली आहे. निवेदनावर विनाश साळुंके, हरी जाधव, अतुल जाधव व इतर पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे़