जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला मरगळ !
By Admin | Updated: October 28, 2014 00:57 IST2014-10-28T00:00:36+5:302014-10-28T00:57:59+5:30
उस्मानाबाद : तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि तत्कालीन अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ढेपाळलेल्या रोजगार हमी योजनेला गती देण्याचे काम केले होते.

जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला मरगळ !
उस्मानाबाद : तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि तत्कालीन अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ढेपाळलेल्या रोजगार हमी योजनेला गती देण्याचे काम केले होते. त्यासाठी जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत बैठका घेवून योजनेचे महत्व पटवून दिले होते. त्यामुळेच मजुरांची संख्या लाखाच्या घरात तर कामांची संख्या हजारोवर होती. मात्र आजघडीला हे चित्र पूर्णपणे उलट झाले आहे. मजुरांची संख्या हजारोच्या घरात तर कामांची संख्या शंभराच्या आत येवून ठेपली आहे.
मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हाती घेण्यात आली. या योजनेला सुरुवातीचे काही वर्ष चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर या योजनेला उतरती कळा आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम आणि सूर्यकांत गुडेवार यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर रोहयो योजनेचे चित्र अत्यंत चिंताजनक होते. आज जी परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा काही वेगळे नव्हते. त्यानंतर गेडाम आणि गुडेवार या जोडगोळीने या योजनेला गती देण्याचा विडा उचलला. त्यानंतर या दोघांनी मिळून जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत संयुक्त बैठका घेवून ग्रामपंचायतींना व यंत्रणेच्या माध्यमातून कामे सुरु करण्याबाबत आव्हान केले होते. कुठेही अडचणी आल्यातरी त्याची सोडवणूक करुन कामे बंद पडू दिली जात नव्हती. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतरस्ते, सिंचन विहीरी आणि अन्य कामेही झाली. मजुरांची संख्या लाखाच्या घरात पोहंचली होती. मात्र आज या योजनेची गत पुन्हा पूर्वीप्रमाणेच झाली आहे. कामांची संख्या शंभराच्या आत येवून ठेपली आहे. तर मजूरांची संख्याही फारसी समाधानकारक नाही. प्रशासनाच्या दप्तरी एकूण कामावरील मजुरांची संख्या ६ हजार ६०३ इतकी अत्यल्प आहे. (प्रतिनिधी)