नाथ्रा ते दिल्ली व्हाया बीड
By Admin | Updated: May 31, 2014 00:55 IST2014-05-31T00:39:58+5:302014-05-31T00:55:22+5:30
लोक नेतृत्व म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी अनेकांना आला.
नाथ्रा ते दिल्ली व्हाया बीड
लोक नेतृत्व म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी अनेकांना आला. बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मतांची घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच राहिली. निवडणुकीच्या आधीपासून गोपीनाथ मुंडे यांची विरोधकांनी चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. निवडणुकीचे संपूर्ण वातावरण पाहिले तर त्यांचा हा एकाकी लढा म्हणावा, इतपत त्यांची कोंडी करण्यात आली होती. स्वत: शरद पवार यांनी या मतदारसंघाला नको इतके महत्त्व दिल्याने बीड मतदारसंघात काय होईल, असे कोणी विचारले तर सांगणे कठिण होऊन बसले होते. बारामती विरूध्द बीड असेच स्वरूप या लढतीचे दिसू लागले होते. शरद पवार यांनी राज्यातील प्रचाराचा शुभारंभही बीड जिल्ह्यातून करून त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मुळात बीड राष्टÑवादीचे वर्चस्व असलेला जिल्हा. राष्टÑवादीत मतभेद असल्याची चर्चा निवडणुकीपूर्वी होत असली तरी शरद पवार यांनी सगळ्या नेत्यांना एकत्र आणत मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्याची रणनिती आखण्यात आली होती. त्यांना बीडमध्येच अडकवून ठेवण्याची भाषाही बोलली जात होती. राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते. जाहीर सभांमधूनही मुंडे यांच्यावर हल्ला केला जात होता. जिव्हारी लागणारी भाषा वापरली जात होती. तरीही ते विचलीत झाल्याचे कुठे दिसले नाही. त्यांच्या पराभवासाठी राष्टÑवादीचे दिग्गज एकत्र आले होते. पाच वर्षे खासदार असतानाही बीडच्या विकासासाठी त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यांचे पुतणे आणि आमदार धनंजय मुंडेही विरोधात आक्रमकपणे उतरले होते. असे हे सगळे घडत असताना मुंडे मात्र आत्मविश्वासाने कामाला लागले होते. त्यांच्या कन्या आणि आमदार पंकजा पालवे गावागावात जाऊन वडीलांचा प्रचार करीत होत्या. राष्टÑवादीचे आमदार विनायक मेटे यांच्यासह दोन माजी आमदार आणि बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड यांच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघात नेमके काय होईल, हे सांगणे कठिणच होते. राष्टÑवादीने तर मुंडे यांचा पराभव झाला हे गृहितच धरले होते. काही जणांनी मुंडे हे २० ते २५ हजार मतांनी निवडून येतील, असे सांगत त्यांचे मताधिक्य घटणार असल्याचा कयास बांधला होता. परंतु हे सगळे अंदाज आणि कयास चुकीचे ठरवित मुंडे यांनी मिळविला दणदणीत विजय हा लोकांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा विजयच म्हणावा लागेल. लोकनेता आणि नेतृत्व कसे असते, हेच या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीत लोकांनी राष्टÑवादीला चकवा दिला आणि मुंडे यांना मताधिक्य दिले. राजकारणातील एक दिलदार व्यक्तीमत्व म्हणून मुंडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. मोठे झाले आणि त्यानंतर त्यांचे बोट सोडून दिले. तरीही त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही आणि आकसही नाही. माझं मीठच आळणी आहे, असे म्हणत त्यांनी आप्त-स्वकीयांनी केलेल्या जखमांवर फुंकरच घातली. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आल्याने एका नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. त्यांच्यामुळे आज बीडला पहिल्यांदाच केंद्रात कॅबिनेट मंत्रपद मिळाले आहे. मुळातच मुंडे यांचे नेतृत्व विकासाभिमुख असल्याने त्यांना मिळालेल्या संधीच ते सोन केल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारणातील ३५ वर्षे संघर्षच करीत राहिलेल्या नेत्याला काम करण्याची मिळालेली ही संधी आहे. त्यांच्याकडून जशा देशाच्या अपेक्षा आहेत, तशा बीडकरांच्याही अपेक्षा आहेत. बीडचा रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रेल्वेचा प्रश्न सुटला तर या जिल्ह्यातील व्यवसायाला गती मिळेल. जिल्ह्यात मोठ-मोठे उद्योग व्यवसाय सुरू झाले तर बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. सिंचनाचा प्रश्नही सोडविणे आवश्यक आहे. बीडसाठी एखादे स्वतंत्र विद्यापीठच झाले तर शिक्षणाच्या नव्या संधी येथे उपलब्ध होतील. गोपीनाथ मुंडे यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी लोकांची अपेक्षा असेल तर ती वावगी नाही. ल्लप्रताप नलावडेनाथ्रा ते दिल्ली हा गोपीनाथ मुंडे यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय जीवनाचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द दिल्लीच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचली आहे. युती सरकारच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी यशाची मोहर उमटविली आहे. ग्रामीण जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि भाजपाला ग्रामीण भागात पोहोचविण्यातही त्यांनी केलेली कामगिरी विसरता येण्यासारखी नाही. प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राजकारणातील आपले स्थान मजबूत केले आहे. देशाचे ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही देशाच्या नकाशावर ते ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाहीत.