नाथषष्ठीची जय्यत तयारी

By Admin | Updated: March 26, 2016 23:51 IST2016-03-26T23:51:52+5:302016-03-26T23:51:52+5:30

पैठण : नाथषष्ठी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शनिवारी (दि.२६) शहरातून संचलन केले.

Nathhashthi Jayate ready | नाथषष्ठीची जय्यत तयारी

नाथषष्ठीची जय्यत तयारी


पैठण : नाथषष्ठी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शनिवारी (दि.२६) शहरातून संचलन केले. ‘भानुदास-एकनाथ’ नामाचा गजर करीत शेकडो दिंड्या पैठणकडे आगेकूच करीत असून रविवारी (उद्या) दुपारनंतर दिंड्या पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे.
पैठण -औरंगाबाद , पैठण -पाचोड ,पैठण -शेवगाव आदी मार्गांसह विविध मार्गांवरून नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंड्या मार्गक्रमण करीत आहेत. काही दिंड्यांनी पैठण तालुक्यात प्रवेश केला आहे. आपल्या नियोजित मुक्कामाच्या गावी थांबलेल्या दिंड्यांचा पाहुणचार मोठ्या श्रद्धेने ग्रामस्थ करीत आहेत. मुक्कामी थांबलेल्या दिंड्यांच्या टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजराने गावागावात भक्तिमय वातावरण ओसंडून वाहत आहे . यंदा रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या दिंड्या व त्यात सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत असल्याने प्रशासन जय्यत तयारीस लागले आहे. वारकरी मुक्कामी थांबत असलेल्या गोदावरीत यंदा पाणी नसल्याने वारकऱ्यांना प्रथमच गोदास्नानास मुकावे लागणार आहे . स्नानासाठी नगर परिषदेतर्फे जवळपास ५०० नळ गोदावरी पात्रात लावण्यात आले असून, टँकरनेसुद्धा पाणी पुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी सांगितले. गोदावरी पात्राची व शहरात मुक्कामी जागा असलेल्या स्थळांची स्वच्छता करण्यात आली आहे. अग्निशमन, आरोग्य, दूरसंचार आदींची कामे पूर्ण झाल्याचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बच्चनसिंह व पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी सांगितले.

Web Title: Nathhashthi Jayate ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.