नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी कधी पकडणार ?

By Admin | Updated: August 5, 2015 00:38 IST2015-08-05T00:38:29+5:302015-08-05T00:38:29+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील समाजसुधारक व विचारवंत शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला येत्या २० आॅगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

Narendra Dabholkar's killers will ever be caught? | नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी कधी पकडणार ?

नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी कधी पकडणार ?


उस्मानाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील समाजसुधारक व विचारवंत शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला येत्या २० आॅगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तर कॉमे्रड पानसरे यांच्या हत्येलाही सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासन यंत्रणेकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील चार हजारांहून अधिक नागरिकांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभरात ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे सर्वव्यापी अभियान राबविले जात आहे. यात विविध उपक्रम आणि प्रबोधनात्मक कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातून एक लाख पत्र भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिली जात आहेत. यात ‘डॉ. नरेंद्र दाभोळकर के कातील कब पकडे जायेंगे?’ असा सवाल थेट राष्ट्रपती महोदयांना विचारला जात आहे. या अभियानाअंतर्गत उस्मानाबाद अंनिस शाखेच्या वतीने शहरातून तब्बल चार हजार ३१० नागरिकांनी पत्राद्वारे राष्ट्रपतीकडे आपला संताप व्यक्त केला आहे.
उस्मानाबाद शाखेच्या वतीने राष्ट्रपतींना पत्र लिहून दाभोळकरांचे खुनी कधी पकडणार? असा प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी उस्मानाबाद शाखेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना याबाबत आवाहन करीत होते. बसस्थानक, सेंट्रल बिल्डींग, तहसील कार्यालय, जिजाऊ चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ख्वाजानगर त्याबरोबर विविध महाविद्यालये, खासगी क्लासेस, पतसंस्था, बँकांमध्ये जाऊन नागरिकांकडून पत्र लिहून घेतले.
अंनिसच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकरणातील आपला संताप पत्राद्वारे व्यक्त केला आहे. यासाठी उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर, राहुल साळवे, राकेश वाघमारे, अभिजित साहू, अनंत बिरादार, शैलेश पाटील,दीपक क्षीरसागर, सुरज मायाळे, उमेश सुरवसे, रहीम तांबोळी, प्रा. रवी निंबाळकर, विश्वजित खोसे, धम्मपाल बनसोडे, रविकिरण गुरव, प्रा. अमोल दीक्षित, मनीषा कुलकर्णी, स्वानंदी वडगावकर, वा. मा. वाघमारे, सज्जोद्दीन शेख, अब्दुल लतीफ, प्रा. समाधान देशमुख यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी आणि समविचारी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Narendra Dabholkar's killers will ever be caught?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.