लघुउद्योगांचे केंद्र म्हणून नारेगाव नावारुपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:40+5:302021-07-07T04:06:40+5:30
औरंगाबाद : कचरा डेपोमुळे अस्वच्छ समजले जाणारे नारेगाव काही वर्षांपासून लघुउद्योगांचे केंद्र म्हणून नावारुपाला आले आहे. विविध प्रकारचे उत्पादन ...

लघुउद्योगांचे केंद्र म्हणून नारेगाव नावारुपाला
औरंगाबाद : कचरा डेपोमुळे अस्वच्छ समजले जाणारे नारेगाव काही वर्षांपासून लघुउद्योगांचे केंद्र म्हणून नावारुपाला आले आहे. विविध प्रकारचे उत्पादन घेणारे लघुउद्योग सुरू झाल्याने परिसरात अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आणि मूलभूत सुविधा व विविध विकासकामांमुळे नारेगाव रोजगाराचे केंद्र बनत आहे.
महापालिका स्थापनेनंतर नारेगाव परिसरात कचरा डेपो तयार करण्यात आला. परिणामी अस्वच्छता वाढून या कचरा डेपोमुळे नारेगाव अस्वच्छ समजले जात होते. परिणामी परिसराचा विकास खुंटला होता. नागरिकांनी आंदोलने केली. त्यानंतर शासन निर्णय घेऊन कचरा डेपो बंद करण्यात आला. त्यानंतर नारेगाव परिसरात मोठमोठ्या इमारती बांधून लहान-मोठे व्यवसाय सुरू केले. यात स्टोव्ह, गॅस रिपेअरींगपासून ते विविध बँकांचे सेवा केंद्र, फर्निचर वर्क, इंजिनिअरिंग वर्कशॉप, रंग तयार करणारे कारखाने, कापड, स्टेशनरी, बांधकाम व्यवसायिकापासून लोखंड, फरशी, सिमेंट इत्यादी व्यवसाय युवकांनी सुरू केले आहेत.
मंगल कार्यालयापासून ते केटरिंग इत्यादी व्यवसायदेखील येथे उभारले आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने परिसरात समृद्धी आली आहे.
रस्ते झाले गुळगुळीत
एकेकाळी पावसामुळे चिखल होऊन वाहने त्यात फसत होती. पायी चालणे तर जिकिरीचे बनले होते. आता रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. अस्वच्छतेमुळे अन्न प्रक्रिया व्यावसायिक चुकूनही या परिसरात फिरताना दिसत नव्हते. आता या परिसरात अन्न प्रक्रिया व्यवसाय सुरू झाले आहेत.
नारेगाव आता उद्यमशील गाव म्हणून नावारुपाला आले आहे. कधीकाळी झोपडपट्टी असलेल्या या परिसरात काँक्रिटच्या इमारती निर्माण झाल्या आहेत. कामगार वसाहत जवळ असल्यामुळे आपली नोकरी गेल्यावर काहीतरी रोजगार सुरू करावा असाच उद्देश समोर ठेवतो. छोटे छोटे उद्योग युवकांच्या रोजगाराचे साधन तयार झाले आहे.
चिकलठाणा औद्योगिक ते शेंद्रा कनेक्टिव्हिटी..
चिकलठाणा एमआयडीसी शेंद्रा एमआयडीसी औद्योगिक कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे. अनेकदा जड वाहनांना महामार्गावर बंदी असते. त्यावेळी जड वाहने सरळ नारेगावमार्गे चिकलठाणा शेंद्रा चालवली जातात.
कचरा डेपोचा उरला डोंगर...
नारेगाव परिसराच्या पूर्वेला कचऱ्याचा डोंगर आजही जुन्या आठवणी करून देतो. कचरा डेपो बंद झाल्यामुळे परिसराचा विकास होऊन गुंतवणुकीचे नवे केंद्र ठरत आहे.