प्लास्टिक कंपनीला नारेगावात आग
By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T00:46:53+5:302014-07-02T01:01:35+5:30
औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली.

प्लास्टिक कंपनीला नारेगावात आग
औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमांनंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये तीन वाहनांसह कंपनीचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्लास्टिकच्या भंगार मालापासून दाणे उत्पादन करणारी नारेगावमध्ये राजकमल एंटरप्रायजेस ही कंपनी आहे. या कंपनीत मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सकाळी वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आग भडकली. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार व व्यवस्थापनाने एमआयडीसी सिडको पोलीस व अग्निशामक दलास आगीची माहिती दिली. त्यानुसार चिकलठाणा अग्निशामक दलाचे प्रभारी एस.एम. शकील, कृष्णा होळंबे, अब्दुल अजीज, अशोक खोतकर, एम.के. झाडे, के.एस. भगत, आर.के. सुरे, के.पी. दांगडे, एस.वाय. घुगे आदी जवानांसह ४ बंब व ४ टँकर घटनास्थळी पोहोचले.
कंपनी परिसरात सर्वत्र प्लास्टिकचे भंगार विखुरले असल्यामुळे चोहोबाजूंनी आग पसरली होती. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान ही आग शेजारच्या कंपनीपर्यंत पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत होते. शेजारच्या कंपनीनेही स्वत:चे ६ टँकर अग्निशामक दलाच्या मदतीला दिले. आग विझविण्यासाठी जवानांना तब्बल २४ टँकर पाण्याचा मारा करावा लागला. आगीत प्लास्टिकचे भंगार, प्लायवूड, कंपनीत उत्पादित केलेले प्लास्टिकचे दाणे, मोठमोठ्या ५-६ मशिनरी, परिसरात उभा असलेला ट्रक (क्र. एमएच-०४- ९००९), छोटा हत्ती-लोडिंग रिक्षा (क्र. एमएच-४२ एसई- ६०८४) व बोलेरो (क्र. एमएच-०४ बीटी- ५६६७) जळून भस्मसात झाली. जवळपास ७० लाख रुपयांची हानी झाल्याचा दावा कंपनीचे मालक शेख नुरुलहक अब्दुल लतीफ (रा. माणिकनगर, नारेगाव) यांनी केला आहे.
बांधलेला घोडा भाजला
राजकमल एंटरप्रायजेस कंपनीच्या आवारात बांधलेला घोडा आगीमध्ये भाजला. कंपनीचे मालक शेख नुरुलहक व काही कर्मचारी सकाळीच नमाज अदा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीच्या आवारात घोडा बांधून ठेवला होता.
कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळच विद्युत डीपी असून आतमध्ये लागूनच मीटरची खोली आहे. या खोलीत शॉर्टसर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला.
पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे चटके लागत असल्यामुळे घोडा सुटकेसाठी धडपडत होता; पण त्याची सुटका करण्याची हिंमत कोणीच करू शकले नाही. अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्याची सुटका केली.