नर्सीत आषाढीनिमित्त भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 23:41 IST2017-07-04T23:37:59+5:302017-07-04T23:41:21+5:30
नर्सी नामदेव : राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या नर्सी येथे ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली.

नर्सीत आषाढीनिमित्त भाविकांची मांदियाळी
रुपेश अल्हाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या नर्सी येथे ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या हजारो भाविकांनी संत नामदेवांचे दर्शन घेतले.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळख नर्सीची ओळख आहे. सर्वप्रथम आज सकाळी ६ वाजता श्रींची महापूजा प्रा.डॉ. बलबीरचंद्र राजूरकर व चंद्रकांत कोटकर या दोन दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली.
आ. तान्हाजी मुटकुळे, रामेश्वर शिंदे, संतोष टेकाळे, माणिक लोडे, विठ्ठल वाशिमकर, भिकूलाल बाहेती, भागवत सोळंके, खंडूजी गायवाळ व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच त्यानंतर सकाळी ६.३० वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले. सकाळपासूनच पंचक्रोशीमधून आलेल्या भाविकांचे जथेच्या जथे दाखल झाल्याने संपूर्ण रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे चित्र दिसून येत होते.
भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन बारीची व्यवस्था केली होती. तर भाविकांना माणिक लोडे यांच्याकडून चहा व फराळाची व्यवस्था केली होती. मंदिर परिसरामध्ये मिठाई, भांडार, चहा नास्ता, फराळाचे दुकान भाजीपाल्याचे दुकान आदी दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
नामदेव फाटा - संत नामदेव मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ अधिकारी, ६१ कर्मचारी १४ महिला कर्मचारी होते. शिवाय पीटी झेड कॅमेऱ्याने परिसरातील लहान-सहान हालचालींवर लक्ष होते. तर १०० स्वयंसेवक व संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा दिवसभर परिश्रम घेतले.