नंदलाल भोमा यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:55+5:302021-07-07T04:05:55+5:30
भोमा हे नंदू घीवाले म्हणून शहरात प्रसिद्ध होते. महावीर भवनसमोरील त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी व्यवहार करीत असताना त्यांना सकाळी ...

नंदलाल भोमा यांचे हृदयविकाराने निधन
भोमा हे नंदू घीवाले म्हणून शहरात प्रसिद्ध होते. महावीर भवनसमोरील त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी व्यवहार करीत असताना त्यांना सकाळी १०.१५ वाजता अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एएस क्लब परिसरातील त्यांच्या निवासस्थानापासून बुधवारी (७ जुलै) सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. बजाजनगर मोहटादेवी मंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुंभारवाडा परिसरातील व्यापाऱ्यांना एकत्र करून त्यांचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते या व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते, तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्यही ते होते. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने ते पाठपुरावा करीत होते. जुन्या शहरात बाजारपेठेत पोलीस चौकीची आवश्यकता लक्षात घेऊन औरंगपुरा चौकात पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी ५ ते ७ वर्षे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपले मोठे बंधू तत्कालीन खा. विजय दर्डा यांचा खासदार निधी आणून औरंगपुऱ्यात पोलीस चौकी उभारली. १० सप्टेंबर २०१३ रोजी पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. जुन्या पिढीतील काँग्रेसचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा गड असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी भागात त्यांनी एकहाती काँग्रेसचा निष्ठेने प्रचार केला. त्यांचे शहरातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी घनिष्ठ संबंध होते. याचा फायदा त्यांनी शहरातील समस्या सोडविण्यासाठी करून घेतला. खराब रस्ते, पाणीटंंचाई, व्यापाऱ्यांची सुरक्षा याविषयी ते जिल्हा प्रशासन व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत होते. मेढ क्षत्रिय सोनार समाजाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांची जैन साधू-संतांवर मोठी श्रद्धा होती. त्यांनी अनेक साधू-संतांची सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.