नांदेडात धो-धो पाऊस
By Admin | Updated: June 18, 2017 00:11 IST2017-06-18T00:08:30+5:302017-06-18T00:11:55+5:30
शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले होते़

नांदेडात धो-धो पाऊस
शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले होते़ तर आनंदनगर, वसंतनगर, हर्षनगर, बाबानगर, नवीन मोंढा, मगनपुरा, यशवंत कॉलेज रस्ता, श्रीनगर, वजिराबाद, बाफना रोड, देगलूर नाका परिसरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते़ नालेसफाई व्यवस्थितरित्या झाली नसल्याने आणि मोठ्या नाल्यातील गाळ, गवत काढले नसल्याने थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी येत आहे़ त्यातच बाबानगर, हर्षनगर आणि वसंतनगर परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते़ या परिसरात असलेल्या शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या हजारो विद्यार्थ्यांना अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला़ तर काही विद्यार्थ्यांनी साचलेल्या पाण्यात धम्माल मस्ती करीत आनंद लुटला़ तरुण दुचाकीस्वारांनी स्टंटबाजीही केली़
यशवंत कॉलेज रस्ता आणि महात्मा फुले शाळेच्या कॉर्नरवर गुडघाभर पाणी साचले होते़ या रस्त्यावर असलेले खड्डे आणि वर आलेले चेंबर्स पाण्यामुळे लक्षात येत नव्हते़ परिणामी अनेक दुचाकीस्वार पाण्यात पडल्याचे पहायला मिळाले़ शिवनगर बायपास, हर्षनगर, नवीन मोंढा, विष्णूनगर परिसरात अनेकांच्या घरात पाणी घुसले़ त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले़ तसेच रस्त्यावर साचलेला कचरा पाण्याने घरात आला़ वजिराबाद, तारासिंग मार्केट आदी भागातील कचरा पाण्यामुळे रस्त्यावर आला़ दरम्यान, शहरातील रस्त्यावर साचलेले पाणी नाल्यांमध्ये काढून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़ मगनपुरा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने साचलेले पाणी आणि नाल्या वाहत्या करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते़ दरम्यान, शिवनगर येथील एका नागरिकाने शेजारच्या नाल्यातील कचरा न काढल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात शिरल्याचे सांगितले़ आमची समस्या कोण सोडविणार? असा प्रश्न त्यांना पडला़
बच्चे कंपनीला आनंद
तासाभरातच रस्त्यासह मैदानांना तळ्याचे स्वरूप आले होते़ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उड्या मारत बच्चे कंपनीने पावसाचा आंनद लुटला़
स्टेडियम रस्ता आणि महात्मा फुले शाळेतील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चे कंपनी उड्या मारताना आढळून आली़