नांदेड रेल्वेस्थानक आता वाय फाय
By Admin | Updated: June 8, 2017 00:29 IST2017-06-08T00:23:05+5:302017-06-08T00:29:57+5:30
नांदेड: नांदेड रेल्वेस्थानकावर येत्या महिनाभरात मोफत वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण- मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी दिली

नांदेड रेल्वेस्थानक आता वाय फाय
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: मराठवाड्यातील मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून औरंगाबाद व नांदेड रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येत आहे. इंटरनेटची उपयुक्तता व प्रसार लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड रेल्वेस्थानकावर येत्या महिनाभरात मोफत वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण- मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
नांदेड विभागातंर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच जलदगती प्रवास करता यावा, यासाठी मुदखेड-नांदेड मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, परभणी - मिरखेल या १७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून तांत्रिकदृष्ट्या तपासणीही करण्यात आली आहे. बुधवारपासून या दुहेरी मार्गाचा वापर करण्यास प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात मिरखेल-पूर्णा या मार्गाचे काम सुरु असून रस्ता सपाटीकरण, पूल बांधणी, सिग्नल उभारणी आदी कामे युद्धस्तरावर केली जात आहेत.
तिसऱ्या टप्प्यात नांदेड-मुदखेड मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुदखेड-परभणी दुहेरीकरणाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण केले जाईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून २०२० पर्यंत मुदखेड-परभणी हा मार्ग विद्युतकरणासहीत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल.
दरम्यान, सिकंदराबाद-मनमाड हा मार्ग एकेरी असून या मार्गावर १२० टक्के वाहतूकघनता आहे. एकट्या नांदेड विभागातंर्गत दररोज १४ एक्स्प्रेस व ४२ पॅसेंजर गाड्या धावतात. या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला २४ तास सतर्क रहावे लागते. या सर्व गाड्यांचे नियोजन करुन दुहेरीकरणाचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे पहिल्या टप्प्याचे काम अल्पावधीत पूर्ण झाले आहे.
या मार्गाच्या कामामुळे काही गाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र आता हे काम पूर्ण झाले असून गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावतील, असे सिन्हा यांनी सांगितले.