नांदेड विभागात पावणेचार कोटींचे वाटप
By Admin | Updated: August 24, 2014 01:15 IST2014-08-24T00:58:56+5:302014-08-24T01:15:57+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड शासनाकडून देय असलेले ५०० कोटी महामंडळास मिळाले़ यातील २१० कोटी रूपये कामगार वेतन करारातील फरकाची रक्कम म्हणून वाटप करण्यात आली़

नांदेड विभागात पावणेचार कोटींचे वाटप
श्रीनिवास भोसले, नांदेड
शासनाकडून देय असलेले ५०० कोटी महामंडळास मिळाले़ यातील २१० कोटी रूपये कामगार वेतन करारातील फरकाची रक्कम म्हणून वाटप करण्यात आली़ नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांना ३ कोटी ७१ लाख २४ हजार रूपयांचे वाटप झाल्याची माहिती विभाग नियंत्रक बालासाहेब घुले यांनी दिली़
शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त झाले होती़ यानंतर महामंडळाचे चेअरमन आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत कामगारांची थकीत रक्कम गणेशोत्सवापूर्वी वाटप करण्याचा आग्रह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी धरला होता़ यानूसार चर्चा करून रक्कम वाटप करण्याची २० आॅगस्ट ही तारीख निश्चित करून विभागवार आणि आगारनिहाय रक्कम जमा करण्यात आली़ यानंतर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतनातील फरकाची रक्कम जमा करण्यात आली आहे़ आठ दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमण होत असून यापूर्वीच एसटी कामगाराच्या वेतन करारातील फरकाचे २१० कोटी रूपये वाटप करण्यात आले़
नांदेड विभागात जवळपास पावणेचार कोटी रूपये वाटप केले जात आहेत़ यामध्ये नांदेड वर्कशॉप आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ४९ लाख ५६ हजार रूपये, नांदेड आगार- ७३ लाख ८७ हजार, देगलूर आगार- २९ लाख ३० हजार, किनवट- २७ लाख ९९ हजार, माहूर- १७ लाख १२ हजार, मुखेड- ४३ लाख, हदगाव- २९ लाख, कंधार- ४१ लाख, भोकर- ३० लाख ४९ हजार रूपये तर बिलोली आगारात ३० लाख असे एकूण ३ कोटी ७१ लाख २४ हजार रूपये एसटील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत़
यापूर्वी वेतन करारातील फरकाच्या रक्कमेचा पहिला टप्पा २५ जून २०१४ रोजी वाटप करण्यात आला होता़ नांदेड विभागामध्ये जवळपास ३ हजार २०० कर्मचारी असून त्यांच्या वेतन करारातील फरकाची रक्कम वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक घुले यांनी सांगितले़
गौरी आणि गणपती सणाच्या अगोेदर ही रक्कम मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे़ एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांची असलेली थकबाकी आता पूर्णपणे कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे़
२५ टक्क्याच्या मागणीवर इंटक ठाम़़़
एसटी कामगार वेतन करार आणि एम़एस़ई़बी वेतन करारात मोठी तफावत असून एसटीचा करार आम्हाला मान्य नसून तो औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार रद्द करून एमएसईबी प्रमाणे २५ टक्के पगार वाढीचा करार करण्यात यावा, या मागणीवर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) ठाम असल्याची माहिती विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे यांनी दिली़ एसटी कामगारांसाठी २०१२ ते २०१६ या कालावधीकरीता झालेल्या वेतन करारातील वाढ इंटकला मान्य नाही़ त्यामुळे सदरील कामगार करार त्वरीत रद्द करून २५ टक्के पगार वाढीचा करार करावा, असे इंगळे म्हणाले़