नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेची दखल
By Admin | Updated: August 13, 2014 00:47 IST2014-08-13T00:42:50+5:302014-08-13T00:47:40+5:30
नांदेड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये निवडणूक प्रक्रियेत नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेची दखल
नांदेड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये निवडणूक प्रक्रियेत नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याचाच परिपाक म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या ‘बेस्ट इलेक्ट्रोरोल प्रॅक्टिसेस’ अर्थात उत्कृष्ट निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या नामांकनात नांदेडच्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर या प्रकारात निवड करण्यात आली आहे़
स्पर्धेसाठी दादरा-नगर हवेलीतील सिल्वासा येथे अंतिम सादरीकरणासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना १३ आॅगस्ट रोजी निमंत्रित केले आहे. निवडणुकीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांच्यासह राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी) चे राजेश भुसारी, सुनील पोटेकर आणि त्यांच्या चमूने तंत्रज्ञान वापराच्या अनुषंगाने सुरुवातीपासून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केला गेला. याच मतदान यंत्राची सरमिसळ (रॅण्डमायझेशन), मतदान प्रक्रियेची त्याचक्षणी (रिअल टाईम) माहिती मिळविण्यासाठीची पोल डे मॉनीटरिंग सिस्टीम ही मोबाईल ‘एसएमएस’वर आधारीत प्रणाली, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष मतदान पाहण्यासाठीची वेब कॉस्टींगची प्रणाली आणि मतदानानंतर मतदान यंत्राच्या ठिकाणी सुरक्षीत ठेवली होती. त्या परिसराचे (स्ट्राँगरुम) थेट प्रक्षेपण संबंधित उमेदवार, महत्वाचे अधिकारी यांना थेट मोबाईलवर उपलब्ध करुन दिले होते. यात प्रत्यक्ष मतदान दिवशीच्या वेब कास्टींगसाठी श्री गुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने प्राचार्य वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता. ‘एसएमएस’ प्रणालीवर आधारीत पोल डे मॉनीटरिंग सिस्टीममुळे मतदारसंघातील अगदी दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनाही वेळेत मतदानाची टक्केवारी वेळोवेळी कळविणे सोपे झाले होते. जिल्हा निवडणूक यंत्रणेने निवडणूक यंत्रणेचे प्रशिक्षण, मतदार जागृतीसह तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापरही केला होता. भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उत्कृष्ट अंमलबजावणीतील विविध घटकांतून तंत्रज्ञानाचा वापर या प्रकारात नांदेडचे नामांकन केले आहे. त्यासाठी सिल्वासा येथे पश्चिम विभागासाठी होणाऱ्या सादरीकणाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून धीरजकुमार यांना निमंत्रित केले आहे. (प्रतिनिधी)