नांदेड जिल्ह्यात चार वर्षांत वीज पडून ७३ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: June 14, 2017 00:29 IST2017-06-14T00:25:54+5:302017-06-14T00:29:19+5:30

नांदेड:दरवर्षी जगात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे़ नांदेड जिल्ह्यातही गेल्या चार वर्षांत वीज पडून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे़

In Nanded district, 73 people die due to electricity in four years | नांदेड जिल्ह्यात चार वर्षांत वीज पडून ७३ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात चार वर्षांत वीज पडून ७३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:दरवर्षी जगात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे़ नांदेड जिल्ह्यातही गेल्या चार वर्षांत वीज पडून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे़ दरवर्षी वीज पडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे विजांचा कडकडाट सुरु असताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे़
मान्सून सक्रिय होण्यापूर्वी एक महिना अगोदर आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते़ पाऊस पडण्याच्या आधी जवळपास दुपारी १ ते ५ च्या सुमारास विजा पडण्याचे प्रमाण अधिक असते़ याच कालावधीत खरिपाची तयारी सुरु असते़ त्यामुळे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, मजुरांचा आणि जनावरांचा विजा पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात़ त्यामुळे झाडाखाली आश्रय कदापि घेऊ नये़ नांदेड जिल्ह्यात २०१४ मध्ये २५, २०१५ मध्ये १७, २०१६ मध्ये १२ आणि २०१७ मध्ये आतापर्यंत एकूण १९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे़ त्यामध्ये उमरी तालुक्यातील कारला येथे झाडाखाली थांबलेल्या पाच महिलांचाही समावेश आहे़ त्यामुळे विजेपासून बचाव करण्यासाठी सर्व तहसीलदार, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, सरपंच यांना सूचना देण्यात आल्या आहेत़ प्रत्येक गावात त्यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिली़
विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्यास- विद्युत सुवाहक असणाऱ्या वस्तूंपासून दूर राहावे़ वाहनाचे रेडीएटर्स, स्टोव्ह, धातूंचे पाईप, धातूंचे वॉश बेसिन, मोबाईल फोन यापासून दूर राहावे़ विद्युत प्लगमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जोडणी करु नये, मोबाईल, इंटरनेटची जोडणी असलेले संगणक, टीव्ही, दूरध्वनी यांचा वापर करु नये़ यामुळे वीज आकर्षित होते़ चारचाकी वाहन विजेपासून सुरक्षित ठेवणारे आहे़ त्यामुळे विजा कडाडत असताना त्यातून बाहेर येऊ नये़ पाण्यात असल्यास त्वरित बाहेर यावे़ बाहेर असल्यास सुरक्षित आसरा घ्यावा, इमारत सुरक्षित आसरा ठरते़ इमारत उपलब्ध नसल्यास गुफा, कपारी हे सुरक्षित ठिकाण ठरतात़ सुरक्षित आश्रय उपलब्ध झालेच नाही तर उंचीच्या वस्तूंखाली आश्रय घेऊ नका़ जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनीला टेकून बसा़ उंच झाड वीजपाताला आकर्षित करतात़ विजा चमकत असताना विद्युत प्रभार जाणवल्यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्वचेला मुंग्या येतात़ त्यावेळी वीज आपल्यावर पडणार हे समजून घ्यावे आणि त्वरित जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे़ त्यामुळे विजेपासून बचाव होईल़

Web Title: In Nanded district, 73 people die due to electricity in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.