नांदेडात १३ लाखांचा गुटखा पकडला
By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-19T23:57:35+5:302014-08-20T00:20:09+5:30
नांदेड: १३ लाख रुपये किंमतीचा गुटखासाठा पथकाने जप्त केला़

नांदेडात १३ लाखांचा गुटखा पकडला
नांदेड: एका खाजगी ट्रान्सपोर्ट कार्यालयावर धाड टाकून ट्रकमधून उतरवण्यात येणारा १३ लाख रुपये किंमतीचा गुटखासाठा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला़ ही कारवाई मंगळवारी दूपारी ३ वाजेच्या सुमारास मुजामपेठ भागात करण्यात आली़ सदरील गुटखा हैदराबाद येथून आणला असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे़
राज्यात गुटखा उत्पादन, साठवणूक व वाहतूकीवर बंदी आहे़ जवळपास अडीच वर्षापासून बंदी असूनही गुटखा विक्री आजही जोमात सुरु आहे़ पाच पट जादा दर आकारून व्यापारी आर्थिक हीत साधत आहेत़ एफडीएच्या पथकाने गत आठ महिन्याच्या कालावधीत चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखासाठा जप्त करण्यात आला़ धाडीत गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केला जात होता़ परंतु गुटखा आणला कोठून याचा तपास मात्र लागत नव्हता़ शहरातील मुजामपेठ भागातील ट्रान्सपोर्टमध्ये गुटखा उतरवण्यात येत असल्याची माहिती एफडीए व पोलिसांना मिळाली होती़ १९ रोजी दुपारी आॅल महाराष्ट्रा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली़ येथे ट्रक क्रमांक यु़पी़ ९२ बी़ ०७४४ मधून गुटखा उतरवण्यात येत असल्याचे आढळून आले़ सदरील गुटखा हैदराबाद येथून आणल्याची माहिती चौकशीत उघड झाली़ गोवा, सितार, रजनीगंधा हे तीन ब्रँड येथे आढळून आले़ सदरील ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक म़ अजीज इकबाल याचे शहरातील मन्यार गल्ली भागात जनता किराणा दुकान असून येथे विक्री करण्यासाठी हा माल आणल्याचे सांगण्यात आले़ याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ सदरील कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे, सहायक पोलिस निरीक्षक निकम, राहूल तायडे, कलंदर कांबळे, मोरे आदींनी सहभाग नोंदवला़
शहर व परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट कार्यालये आहेत़ येथून विविध मालाची मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात केली जाते़ गुटख्याचे ट्रान्सपोर्ट कनेक्शन उघड झाल्याने यापुढे गोडाऊनसह मालवाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे़ (प्रतिनिधी)