डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस
By Admin | Updated: December 15, 2014 00:50 IST2014-12-15T00:42:33+5:302014-12-15T00:50:46+5:30
औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद-रेनीगुंटा-औरंगाबाद एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर आता नांदेड-औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे

डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस
औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद-रेनीगुंटा-औरंगाबाद एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर आता नांदेड-औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे, तर औरंगाबादकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून अकोलामार्गे जाहीर केलेल्या नांदेड-बिकानेर रेल्वेला रेल्वे बोर्डाकडून अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरच ही गाडी धावणार आहे.
रेनीगुंटा एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी. बी. निनावे यांनी ही माहिती दिली. याशिवाय त्यांनी रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती दिली. परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर असतानाही केवळ निधीअभावी रखडले आहे, तर ‘आयटीडीसी’च्या सहकार्याने मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम केले जाणार आहे.
यासाठी रेल्वेचा निधीही उपलब्ध आहे; परंतु ‘आयटीडीसी’कडून अद्यापही यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामही रखडले आहे. रेल्वेस्थानकातील सरकत्या जिन्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
नांदेड विभागास ६४ गाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी १ लाख २० हजार प्रवाशांची वाहतूक करण्याचे टार्गेट आहे; परंतु विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हेच कारण पुढे करून अनेक प्रस्ताव नाकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड-मनमाड पॅसेंजरला लागलेल्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर प्रवासी ज्वलनशील पदार्थ बाळगतात हे वेळोवेळी केलेल्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवाय आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून या घटनेची तपासणी करण्याची तयारी रेल्वेने केली आहे.