नंदागौळचे कार्डधारक रेशनपासून वंचित
By Admin | Updated: June 15, 2014 00:56 IST2014-06-15T00:18:46+5:302014-06-15T00:56:08+5:30
नंदागौळ:येथे परवानाधारक दुकानदार नसल्यामुळे ८०० कार्डधारकांचे रेशन व रॉकेल द्वारपोच वाटप करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिले होते.

नंदागौळचे कार्डधारक रेशनपासून वंचित
नंदागौळ:परळी तालुक्यातील नंदागौळ येथे परवानाधारक दुकानदार नसल्यामुळे गावातील ८०० कार्डधारकांचे रेशन व रॉकेल द्वारपोच रेशनद्वारे वाटप करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिले होते. त्यानुसार तीन महिन्याला रेशनचे वाटप करण्यात आले. मात्र मागील चार महिन्यांपासून रेशनचे वाटप न करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत.
तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी कार्डधारकांना रेशनचे वाटप करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन वेळेस तीन महिन्याला वाटप करण्यात आले व एक वेळेस रॉकेलचे वाटप केले. मात्र नंतर चार महिने होऊनही हे रेशन व रॉकेल वाटप करण्यात आले नसल्याने गावातील कार्डधारकांमध्ये प्रशासनाविरूद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
काही कार्डधारकांची नावे या योजनेत न आल्यामुळे हे कार्डधारक आमरण उपोषणास बसले होते. जवळपास दीडशे कार्डधारक वंचित आहेत. तहसीलदारांनी लेखी आश्वासन देऊनही कार्डधारकांना अद्याप लाभ मिळालेला नाही. याबाबत परळीचे तहसीलदार ए.बी. जटाळे म्हणाले, संबंधित तलाठी यांना याबाबत सांगितले आहे. लवकरच वाटप करण्यात येईल. ग्रा.पं. सदस्य सुंदर गित्ते म्हणाले, दोन दिवसांत रेशन व रॉकेलचे वाटप न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. (वार्ताहर)