व्यवस्थापनाविना मनपा
By Admin | Updated: August 5, 2016 00:14 IST2016-08-05T00:03:27+5:302016-08-05T00:14:37+5:30
लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़

व्यवस्थापनाविना मनपा
लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़ मात्र लातूर मनपात असा कक्ष कार्यान्वित नाही़ गेल्या शनिवारी झालेल्या मोठ्या पावसात शहरातील अनेक नगरांतील घरामध्ये पाणी शिरले़ परंतु, मनपाला शहाणपण आले नाही़ ना आपत्ती व्यवस्थापन कक्ष ना नाले सफाई, अशी स्थिती आहे़
गेल्या शनिवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठा पाऊस झाला़ नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहिले़ लातूर शहरातल्या नाल्यांची साफ सफाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा होवू शकला पाणी़ परिणामी, गरूड चौक, हत्ते नगर, कस्तूरे गार्डन, सिद्धेश्वर चौक, बरकत नगर आदी परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले़ पाच वर्षांपूर्वी असाच मोठा पाऊस झाला होता़ त्यावेळी तर शहरातील सकल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते़
दोन-चार दिवसांसाठी त्या परिसरातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करावे लागले होते़ हा पूर्वानुभव असताना मनपात अद्याप आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन झालेला नाही़ अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संयुक्त टीम तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करता येवू शकतो़
मात्र मनपात असा कक्ष स्थापन झाला नाही़ अपुरे मनुष्यबळ, पैशाची कमतरता आदी कारणे सांगून, याकडे मनपा प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे़ रात्री-बेरात्री पाऊस झाला तर नागरिकांनी कोणाशी संपर्क साधावा, अशी सद्यस्थिती आहे़ गेल्या शनिवारी झालेल्या पावसामुळे गरूड चौकात एका माजी नगरसेविकेच्या घरात पाणी शिरले़ त्यांनी मनपा प्रशासनाकडे नाले सफाईची मागणी केली, परंतु, अद्याप सफाई करण्यात आलेली नाही़ काही भागात नाल्या सफाई न केल्यामुळे तर काही भागात नाल्याच नसल्यामुळे घरात पाणी शिरत आहे़ महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नसल्यामुळे नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी असा प्रश्न आहे़
सकल भागातील नाल्यांमध्ये गाळ साचला आहे़ दगड-गोट्यांचे प्रमाणही आहे़ त्याची दुरूस्ती केली जात नाही़ त्यामुळे नाल्या तुंबून पाणी घरात येत आहे़ शनिवारी झालेल्या एका मोठ्या पावसामुळे अनेक नगरांतील घरात पाणी घुसले होते़ तरीही प्रशासन थंड आहे़