‘सातबारा’ वर येणार महिलांचीही नावे
By Admin | Updated: July 30, 2016 00:59 IST2016-07-30T00:50:49+5:302016-07-30T00:59:45+5:30
औरंगाबाद : सातबारा उताऱ्यावर आता पुरुषांच्या बरोबरीने घरातील महिलांचीही नावे लिहिली जाणार आहेत. १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या राजस्व अभियानाचे हे वैशिष्ट्य ठरणार आहे.

‘सातबारा’ वर येणार महिलांचीही नावे
औरंगाबाद : सातबारा उताऱ्यावर आता पुरुषांच्या बरोबरीने घरातील महिलांचीही नावे लिहिली जाणार आहेत. १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या राजस्व अभियानाचे हे वैशिष्ट्य ठरणार आहे.
पुरुषांची ‘अर्धांगिनी’ समजल्या जाणाऱ्या महिलांची नावे सातबारा उताऱ्यावर नसतात. त्यामुळे शेती, जमिनींच्या मालकीवर पुरुषांचाच हक्क राहतो. अनेकदा व्यसनातून जमिनींची विक्री केली जाते. अशा व्यक्तीचे कुटुंब त्यानंतर अडचणीत येते.
पुरुषांच्या बरोबरीने घरातील महिलेचे नावही सातबारा उताऱ्यावर लावल्यास जमीन विक्रीचे व्यवहार त्यांच्या सहमतीनेच होतील. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने पुरुषांच्या बरोबरीने महिलांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी १९९२ यावर्षी लक्ष्मीमुक्ती योजना जाहीर केली होती; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. राजस्व अभियानानिमित्त त्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली.
शिधापत्रिकावर कुटुंबप्रमुख म्हणून नोंदी
महसूल दिनानिमित्त राज्यात दरवर्षी १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत राजस्व अभियान राबविले जाते. यंदा या कालावधीत महिला सक्षमीकरण मोहीम राबविली जाणार आहे. वारस नोंदी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेल्यास नव्याने त्यांच्या नोंदी घेतल्या जातील तसेच महिला शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने केला जाईल. रोजगार हमी योजनेतील ‘जॉब कार्ड’धारक महिला मजुरांचे मेळावे या कालावधीत घेतले जातील. शिधापत्रिकांवर कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या नावाच्या नोंदी घेतल्या जातील. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुली तसेच मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जाईल. शाळा व महाविद्यालयांत मुलींच्या दाखले वितरणासाठी शिबिरे घेतली जाणार आहेत.