सेवेच्या नावाखाली केंद्रांवरील लूट सुरूच

By Admin | Updated: September 7, 2014 00:27 IST2014-09-07T00:24:20+5:302014-09-07T00:27:50+5:30

वसमत : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व अन्य कामांसाठी राष्ट्रीयकृत बँकांचे खाते उघडण्यास गेलेल्या सामान्य नागरिकांची लूट ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून अखंडितपणे सुरू आहे.

In the name of service, loot the centers | सेवेच्या नावाखाली केंद्रांवरील लूट सुरूच

सेवेच्या नावाखाली केंद्रांवरील लूट सुरूच

वसमत : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व अन्य कामांसाठी राष्ट्रीयकृत बँकांचे खाते उघडण्यास गेलेल्या सामान्य नागरिकांची लूट ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून अखंडितपणे सुरू आहे. ग्रामस्थांच्या या लुबाडणुकीकडे मात्र अद्यापपर्यंत एकाही पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसल्यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत.
वसमत शहरात व तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने ग्राहकसेवा केंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रांवर बँकांचे खाते काढण्याची सुविधा आहे. आता केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान जन-धन योजनेचीही खाते काढण्याची सुविधा आहे. येथे खाते काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना नि:शुल्क खाते उघडून देण्याऐवजी ग्राहक सेवा केंद्रावर प्रत्येकी २०० ते ५०० रुपयांची वसुली करण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी बँक खाते काढण्यासाठी तर सर्वाधिक अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
या प्रकाराने शिष्यवृत्तीचे लाभधारक विद्यार्थी, पालक व सामान्य त्रस्त झाले आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी एकाही पक्षाच्या नेत्याने पुढाकार घेतला नाही की कार्यकर्त्यांनीही ही लूट थांबविण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत.
सर्वच पक्षाचे पदाधिकारी केवळ लेटरपॅडपुरतेच झाले आहेत. नेत्यांच्या मागेपुढे फिरून कामे मिळवायची व नेत्यांची वाहवा करायची.
याव्यतिरिक्त जनतेच्या कामासाठी आंदोलन किंवा पाठपुरावाही करावा लागतो, याचा विसर पडल्यानेच जनतेची लूट सुरू आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्वच केंद्रावर ही लूट सर्रास सुरू आहे. मात्र एकाही केंद्रावर कारवाई किंवा चौकशी न झाल्याने केंद्रचालक निर्धास्त आहेत व खाते उघडण्यासाठी पैसे घ्यावेच लागतात, अशी भूमिका घेत आहेत.
याप्रकरणी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व केंद्रावर नि:शुल्क सेवेचा फलक लावण्याची सूचना केली आहे.
ग्राहकांची लूट होणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचनाही तहसीलदारांनी केली आहे.
चार दिवसांपुर्वी सुरू झालेला हा प्रकार थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. कारण जादा शुल्क आकारणीचे संबंधितांकडून समर्थन केले जात असून सामान्य जनतेला याची माहिती नसल्याने ते विनाकारण भरडले जात आहेत. (वार्ताहर)

Web Title: In the name of service, loot the centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.