नुकसान झालेल्या शेतकऱ्यांऐवजी अनुदानात दुसऱ्यांची नावे
By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-19T23:38:30+5:302014-06-20T00:44:13+5:30
वडवणी: तालुक्यातील देवडी येथील भागात ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही त्यांची नावे गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांऐवजी अनुदानात दुसऱ्यांची नावे
वडवणी: तालुक्यातील देवडी येथील भागात ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही त्यांची नावे गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप देवडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे.
देवडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी उबाळे यांनी ज्या शेतकऱ्यांची नावे देवडी शिवारातील सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करुन प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. धनराज श्रीहरी देशमुख गट नं. ३४४, यादी क्र.३२ व रक्कम ९ हजार, रमाबाई श्रीहरी देशमुख गट नं. ९८, यादी क्र.६३ व रक्कम ६ हजार, गणेश दिगंबर देशमुख गट नं. २०५, यादी क्र.९४ व रक्कम १२ हजार, मंदा धनंजय देशमुख गट नं. ३३९, यादी क्र.१२७ व रक्कम १८ हजार व मनीषा गणेश देशमुख गट नं. ३३६, यादी क्र.१५८ व रक्कम ९ हजार या पाच व्यक्ती पिंपरखेडच्या रहिवासी आहेत. मात्र त्यांच्या नावसमोर दर्शविलेले गट नं. देवडी शिवारातील शेतकऱ्यांचे आहेत.
त्याचा पुरावा म्हणून देवडी येथील गट क्रमांकाचा सातबारा जोडण्यात आला आहे. वरील व्यक्ती पिंपरखेड येथील रहिवाशी असून, त्यांचा पिंपरखेड येथील मतदान यादीचा पुरावाही जोडण्यात आला आहे. तसेच गट नं. ३६ हा मारुती देवस्थानाचा असून, या गट नं. ३६ मध्ये यादीतील १६९ ते २२१ या लोकांची नावे सातबारा व ८ अमध्ये कोठेही नावे नाहीत. मात्र त्यांना अनुदान देण्यात आले आहे. हे पाच व्यक्ती तलाठी व त्यांचे सहायक यांच्या कुटुंबातील नावे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
निवेदनावर विश्वास आगे, जावेदखाँ महेबूबखाँ पठाण, रामप्रसाद आगे, महादेव नाईकवाडे, विश्वनाथ झाटे आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)