जिवंत व्यक्तीचे नाव मयताच्या यादीत
By Admin | Updated: November 3, 2016 01:40 IST2016-11-03T01:38:13+5:302016-11-03T01:40:02+5:30
लोहारा :तोरंबा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन मयत नऊ व्यक्तींची यादी तहसील कार्यालयाला पाठविली. मात्र, यात एका जिवंत असलेल्या व्यक्तीच्या नावाचाही समावेश

जिवंत व्यक्तीचे नाव मयताच्या यादीत
लोहारा : शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमधून मयत, स्थलांतरित व बोगस नावाचा शोध घेवून कळविण्याच्या सुचना तहसील प्रशासनाने दिल्यानंतर तोरंबा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन मयत नऊ व्यक्तींची यादी तहसील कार्यालयाला पाठविली. मात्र, यात एका जिवंत असलेल्या व्यक्तीच्या नावाचाही समावेश असल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून वयोवृध्द , निराधार, विधवांना संजय गांधी निराधार योजना व इंदीरा गांधी निराधार योजनेतंर्गत मासिक वेतन दिले जाते. याचा त्या कुटूंबाला चांगला अधार असतो. मात्र, अनेकवेळा धनधागडे याचा फयदा घेतना दिसतात. तर खरोखर ज्यांना गरज आहे; ते मात्र या योजनेपासून वंचित राहतात. दरम्यान, शासनाच्या विविध योजनांमधून देण्यात येत असलेल्या वेतनासंदर्भात मयत, स्थलांतरित व बोगस नावांचा शोध घेवून कळविण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने आॅगस्ट महिन्यात तलाठी व ग्रमासेवकांना बैठक घेवून दिल्या होत्या. या नुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी अशा नावांचा शोध घेऊन नंतर या याद्यांचे १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत वाचन करण्यात आले व त्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.
दिवाळीनिमित्त या लाभार्थी वयोवृध्दांचे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन संबंधित बँकांत जमा झाल्यामुळे तालुक्यातील तोरंबा येथील किसन महादू कांबळे (वय ८७) हे धानुरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम उचलण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या खात्यावर पगार जमा झाली नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालय गाठून याबाबत विचारणा केली. यावेळी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या मयत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कांबळे यांना सांगितले. तसेच आता तुम्ही हयात असल्याचे प्रमाणपत्र आणा. त्यानंतरच तुमची पगार सुरू होईल, असेही संजय गांधी योजनेचे बी. बी. मठपती यांनी कांबळे यांना सूचविले. (वार्ताहर)